दिंडोरी : तालुक्यातील अवनखेड येथील कृषी पदविकाधारक युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केली असून, आत्महत्त्येचे कारण समजू शकलेले नाही. अवनखेड येथील चेतन चंद्रकांत वसाळ (जाधव) (२३) या युवकाचा मृतदेह सोमवारी सकाळी त्याच्या मालकीच्या द्राक्षबागेत आढळून आला. त्याने विषारी औषध प्राशन करून रविवारी रात्री आत्महत्त्या केल्याचा अंदाज आहे. त्याने कृषी पदविकेचे शिक्षण घेतलेले होते. त्याच्या वडिलांच्या नावावर शेती असून, यापूर्वीही त्यांनी सोसायटीच्या कर्जफेडीसाठी काही जमीन विकून कर्ज भरल्याची चर्चा आहे. वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीवर खासगी बँकेचा बोजा आहे. दिंडोरी पोलिसांनी पंचनामा करत घटनेची नोंद केली आहे. मात्र आत्महत्त्येचे कारण कळू शकलेले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पगार, आव्हाड, वाघ आदि करीत करीत आहे . दरम्यान, चेतन याच्या नावावर जमीन नाही, मात्र वडिलांच्या नावाने जमीन असून, त्यावर एका खासगी बँकेचा सुमारे बारा लाखांचा बोजा आहे, तसा अहवाल महसूल प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. (वार्ताहर)
अवनखेड येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्त्या
By admin | Updated: March 28, 2017 02:00 IST