पोलीस आयुक्तालयात आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:18 IST2017-09-09T00:17:58+5:302017-09-09T00:18:08+5:30
पतीसोबत सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादात पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत महिलेने गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळ करीत विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) सायंकाळच्या सुमारास शहर पोलीस आयुक्तालयात घडली़

पोलीस आयुक्तालयात आत्महत्येचा प्रयत्न
नाशिक : पतीसोबत सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादात पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत महिलेने गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळ करीत विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) सायंकाळच्या सुमारास शहर पोलीस आयुक्तालयात घडली़ रेहाना मुजरीम खान (पार्कशेड अ, पार्कसाइड अपार्टमेंट, वडाळा- पाथर्डी रोड, इंदिरानगर, नाशिक) असे या महिलेचे नाव आहे़ या महिलेस उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तिच्यावर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, पोलिसांनी गोंधळ घालणाºया नातेवाइकांना ताब्यात घेतले आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेहाना खान या महिलेचे पती मुजरीम खानसमवेत मालमत्तेवरून वाद सुरू आहेत़ तिचा पती तिच्यासोबत राहत नसून या प्रकरणात पोलिसांनी मदत करून मालमत्ता मिळवून द्यावी, अशी रेहाना व तिच्या नातेवाइकांची मागणी असून, यासाठी ते दुपारी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गेले होते़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये यांनी हा दिवाणी दावा असून, न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला़ यामुळे रेहाना व तिच्या नातेवाईक दाद मागण्यासाठी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्तालयात पोहोचले़ पोलीस आयुक्तालयातील दुसºया मजल्यावर पोलीस अधिकाºयांची बैठक सुरू असल्याने त्यांना बसण्यास सांगण्यात आले़ याचा राग आल्याने नातेवाइकांनी पोलिसांना शिवीगाळ करीत गोंधळ घातला व दुसºया मजल्यावर पोहोचले़
दरम्यान, या काळातच रेहाना खान या महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला़ यामुळे पोलीस आयुक्तालयात एकच गोंधळ उडाला व पोलिसांनी नातेवाइकांना ताब्यात घेत विषारी औषध प्राशन केलेल्या रेहाना हिस इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक बेल्हेकर यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़