मालेगावी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर महिलेस मारहाण
By Admin | Updated: June 10, 2015 22:27 IST2015-06-10T22:26:51+5:302015-06-10T22:27:10+5:30
मालेगावी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर महिलेस मारहाण

मालेगावी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर महिलेस मारहाण
मालेगाव : येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर एका महिलेला
दुपारी दोनच्या सुमारास तिच्या पतीसह चार ते पाच जणांनी
बेदम मारहाण केली. यामुळे कॅम्प रस्त्यावर गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी झाली होती.
येथील न्यायालयात पती-पत्नीचा दावा दाखल असून, त्याची बुधवारी तारीख होती. त्यामुळे मुलीकडील नातेवाईक व सासरचे मंडळी न्यायालयात आले होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास सदर महिला न्यायालयाच्या प्रवेशद्वारातून बाहेर कॅम्प रस्त्यावर येताच येथील झाडाजवळ वाट पाहत असलेल्या तिच्या पतीसह सासरच्या नातेवाइकांनी तिला थांबवून मारहाण करण्यास सुरुवात केली. या महिलेला खाली पाडून मारहाण करत असताना बघ्यांनी मात्र मोठी गर्दी केली होती. एका महिलेला दिवसाढवळ्या भर रस्त्यावर मारहाण होत असताना एकाही समाज रक्षकाने मारहाण करणाऱ्यांना जाब विचारला नाही. बघ्यांनी गर्दी केल्याने महिलाची सुटका झाली. मारहाण करणारे चारचाकी वाहनात बसून निघून गेले. या प्रकारामुळे येथे बघ्यांची गर्दी वाढल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. यावेळी वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी येथे उपस्थित नव्हता. येथील न्यायालयाबाहेर महिलांना मारहाण करण्याच्या घटनात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे.