पाण्याअभावी चारा सुकला
By Admin | Updated: April 30, 2017 23:14 IST2017-04-30T23:14:25+5:302017-04-30T23:14:48+5:30
बेलगाव कुऱ्हे : भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत जात आहे. सलगच्या दुष्काळी स्थितीमुळे शेती वाचविणे शेतकऱ्यांपुढे मोठे अवघड होऊन बसले आहे.

पाण्याअभावी चारा सुकला
बेलगाव कुऱ्हे : सूर्य आग ओकत असून, भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात खालावत जात आहे. सलगच्या दुष्काळी स्थितीमुळे शेती वाचविणे शेतकऱ्यांपुढे मोठे अवघड होऊन बसले आहे. उन्हाच्या कडाक्यापासून शेतातील उभे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे; मात्र त्यातही त्यांना अपयश येत आहे.
परिसरातील काही शेतकऱ्यांनी यावर्षी बागायती शेती केली; मात्र पाण्याची कमतरता असल्याने फळे सुकून गेली आहेत. पाणी न मिळाल्याने डाळिंब फळाची फुगवन झाली नाही. यातही आर्थिक फटका बसणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पारंपरिक शेतकरी व व्यवसायिक दुष्काळाच्या गर्तेत सापडले आहेत. दोन-तीन वर्षांपासून पावसाने शेतकऱ्यांना हवी तशी साथ दिली नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. डोक्यावरील कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांचा स्वस्तही बसू देत नाही अशा स्थितीत जगावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मेहनतीने उभी केलेली पिके डोळ्यांदेखत पाण्याअभावी नष्ट होताना पाहावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी विकत पाणी घेऊन शेती वाचविण्याचा प्रयत्न केला आहे; निसर्गाने यातही त्यांची थटा केली. उन्हाचा तडाका वाढण्याने सर्वत्र पिण्याच्या पाण्याची दाहकता निर्माण झाली आहे. सकाळी १० वाजेनंतरच परिसरातील रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहे. यामुळे छोट्या- मोठ्या व्यवसायांवरदेखील उन्हाच्या दाहकतेचा परिणाम झाला आहे. तालुक्याच्या पूर्वभागात शेतीला पूरक असा दुग्धव्यवसाय केला जातो. मात्र चारा-पाण्याच्या टंचाईमुळे तोही संकटात आला आहे. परिसरातून हजारो लिटर दुधाचे संकलन केले जाते. मात्र सद्यस्थितीत दुधामध्ये मोठी घट निर्माण झाली आहे.
उन्हाचा दाहकतेमुळे जनतेची लाही लाही होते. तसा मुक्या जनावरांनादेखील उन्हाचा त्रास होत आहे. पाणी व चारा नसल्याने दुधाळ जनावरे दूध देत नाहीत. यामुळे दुग्धव्यवसाय करणारेही संकटात सापडले आहेत. इगतपुरी तालुक्याची दुष्काळाची दाहकता दिवसागणिक वाढतच आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील छोटी-मोठी धरणे, नदीपात्र कोरडी पडली आहेत. धरणांच्या तालुक्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदीचे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील गावांची पाण्याची परिस्थिती चिंताजनक आहे. अशा स्थितीत गोधन वाचविणे कठीण होऊन बसले आहेत.
जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांपुढे पशुधन वाचविणे मोठे आव्हान आहे. इगतपुरी तालुक्याची निसर्गसौंदर्याने परिपूर्णतेची ओळख इतर जिल्ह्यात असल्याने परजिल्ह्यांतून मेंढपाळांचे येथे स्थलांतर झाले आहे. मात्र त्यांनाही यावर्षी पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे. (वार्ताहर)