अचानक भेटीत ‘प्रति’ पदाधिकाऱ्यांची भंबेरी जिल्हा परिषदेतील प्रकार, सीईओ पाहणी
By Admin | Updated: March 4, 2015 01:02 IST2015-03-04T01:02:15+5:302015-03-04T01:02:42+5:30
अचानक भेटीत ‘प्रति’ पदाधिकाऱ्यांची भंबेरी जिल्हा परिषदेतील प्रकार, सीईओ पाहणी

अचानक भेटीत ‘प्रति’ पदाधिकाऱ्यांची भंबेरी जिल्हा परिषदेतील प्रकार, सीईओ पाहणी
नाशिक : जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांच्या नातलगांची वाढती लुडबूड पाहता प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकानंतर कमी झालेली लुडबूड पुन्हा वाढल्याच्या तक्रारी येताच काल (दि.३) मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी त्यांचा मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या कक्षाकडे वळविला. या अचानक भेटीने दोेघा महिला पदाधिकाऱ्यांच्या नातलगांची त्यांच्या कार्यालयातील उपस्थितीमुळे चांगलीच भंबेरी उडाल्याचे चित्र होते. मुळातच जिल्हा परिषदेचा कारभार पदाधिकारी व कारकून सांभाळत आहेत, अशी चर्चा असतानाच आता काही अनाहुत पाहुण्यांचाही राबता जिल्हा परिषदेत वाढला आहे. जिल्हा परिषदेशी काडीचा संबंध नसलेले राजकीय पक्षाचे पदाधिकारी, तसेच काही कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयाबाहेर नियुक्त्या असतानाही त्यांचा मुख्यालयातील वाढता वावर या सर्व बाबींची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी पदाधिकाऱ्यांच्या कक्षांना भेटी दिल्या. त्यात दोन महिला पदाधिकाऱ्यांच्या कक्षात महिला पदाधिकाऱ्यांचे नातलग असल्याचे आढळून आले. मात्र, त्याबाबत सुखदेव बनकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त न करता पाहणी करत पुन्हा त्यांचे कार्यालय गाठले. वर्षानुवर्षे एकाच जागी असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायकांच्या बदल्या केल्यानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नजर पदाधिकाऱ्यांच्या काही चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर असून, त्यांचीही खांदेपालट करण्याची तयारी सुखदेव बनकर यांनी केल्याचे समजते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या अचानक तपासणी व पाहणी भेटीमुळे दोघा महिला पदाधिकाऱ्यांच्या नातलगांची चांगलीच भंबेरी उडाली. एका नातलगाने सुखदेव बनकर येताच कक्षातून पोबारा केला, तर दुसऱ्या महिला पदाधिकाऱ्याच्या नातलगाने आपली बैठक आटोपती घेत थेट मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय गाठल्याचे समजते.(प्रतिनिधी)