सायखेडा, चांदोरीत वादळासह गारा
By Admin | Updated: April 30, 2017 23:54 IST2017-04-30T23:53:59+5:302017-04-30T23:54:12+5:30
सायखेडा : गोदाकाठ भागात सायखेडा, चांदोरी, शिंगवे भागात दुपारी ५ वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

सायखेडा, चांदोरीत वादळासह गारा
सायखेडा : गोदाकाठ भागात सायखेडा, चांदोरी, शिंगवे भागात दुपारी ५ वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.
हवामान खात्याने कोणताही अंदाज वर्तवलेला नसताना अचानक झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतात पडून आहे. यंदा याअगोदर गारपीट झाली नाही त्यामुळे आत्ता होणार नाही असे शेतकऱ्यांना वाटत होते. त्यामुळे गाफील असलेल्या शेतकऱ्यांची अचानक तारांबळ उडाली. कांदा साठवणीसाठी ठेवला आहे. मात्र गुदाम, चाळीत साठवणुकीची कामे सुरू आहेत, तर काही शेतकऱ्यांनी अद्याप एकही कांदा साठवला नाही. शेतात कांदा तसाच पोळ स्वरूपात पडलेला आहे. अचानक झालेल्या वादळ व गारपिटीने कांदा झाकण्यासाठी धावपळ करावी लागली, तर अनेक शेतकऱ्यांची द्राक्षबाग कोलमडलेल्या बाजारभावामुळे आणि व्यापारी खरेदी करत नसल्याने पडून होती. आता अचानक झालेल्या गारांनी द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता भुईसपाट झाला आहे. १० रु पये किलोने थोडेफार पैसे हाती पडले असते पण आता तेदेखील पदरात पडणार नाहीत. त्यामुळे शेतकरी या अस्मानी संकटाने पुरता हातघाईस आला आहे.
लासलगाव येथेही रविवारी दुपारी कोणत्याही प्रकारचे पावसाळी वातावरण नसताना अचानक मेघ दाटले व दुपारी चार वाजता सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसाने व जोरदार वाऱ्याचे लासलगाव येथील वातावरणात असलेला उष्मा कमी केला. या अवकाळी पावसामुळे लासलगाव येथील आठवडे बाजारात आलेले दुकानदार व शेतकरी तसेच बाजारकरू यांची एकच तारांबळ उडाली. (वार्ताहर)