विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचे वेध
By Admin | Updated: May 9, 2017 23:43 IST2017-05-09T23:43:41+5:302017-05-09T23:43:41+5:30
नाशिक : तंत्रशिक्षण संचालनालयाकडून अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी गुरुवारी (दि.११) होणार आहे.

विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचे वेध
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : तंत्रशिक्षण संचालनालयाकडून अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी गुरुवारी (दि.११) होणार असून, उच्चशिक्षण संचालनालयामार्फत बीएड अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा १३ व १४ मे रोजी नाशिक शहरातील विविध परीक्षा केंद्रांवरून घेतली जाणार असल्याने तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासह शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सीईटी परीक्षेचे वेध लागले आहेत.तंत्रशिक्षण संचालनालयाकडून अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या हाती आजचाच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी केलेल्या अभ्यासाची धावती उजळणी सुरू केली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २० हजार ५७६ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले असून, शहरातील ४९ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. शहरातील विविध केंद्रांवर गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही परीक्षा पार पडणार असून, परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) हे पेपर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेच्या नियोजनासाठी शहरात ४९ परीक्षा केंद्रांवर सुमारे १२०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अभियांत्रिकी तसेच औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा देणे अनिवार्य आहे. तर महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षण संचालनालयातर्फे शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरीक्षेसाठी जिल्हाभरातून सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, एम.एड. सीईटी परीक्षेसाठी मंगळवार, दि.२५ मेपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना १५ मेपर्यंत सीईटी परीक्षेचा अर्ज भरता येणार असून विद्यार्थ्यांनी या परीक्षेचीही जोरदार तयारी सुरू केली आहे.
शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमास नाशिकमधून प्रतिसाद
गेल्या काही वर्षांपासून बीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. गेल्यावर्षी राज्यातील ५२ हजार जागांसाठी केवळ ३६ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. त्या तुलनेत नाशिकचे प्रमाण समाधानकारक असून, जिल्हाभरातील १२ महाविद्यालयांमधील सुमारे २,२५० जागांसाठी सुमारे पाच ते सहा हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षेला प्रविष्ट होत असतात. शहरातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयांकडून बी.एड. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यात विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यात आल्याने यावर्षी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.