शाळा प्रशासनाविरुद्ध विद्यार्थी-पालकांची साक्ष
By Admin | Updated: June 11, 2017 00:21 IST2017-06-11T00:20:51+5:302017-06-11T00:21:05+5:30
इंदिरानगर : येथील केंब्रिज शाळा प्रशासनाच्या अरेरावीमुळे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची साक्ष घेण्यात आली.

शाळा प्रशासनाविरुद्ध विद्यार्थी-पालकांची साक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदिरानगर : येथील केंब्रिज शाळा प्रशासनाच्या अरेरावीमुळे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची साक्ष घेण्यात आली. तसेच घटनास्थळाचा पंचनामाही करण्यात आला आहे.
केंब्रिज शाळेच्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना दाखले पाठविल्याने आणि सुमारे पंधरा विद्यार्थ्यांना फी न भरल्याने वर्गाबाहेर काढून शाळेच्या प्रांगणात बसविण्यात आले होते. तसेच शुक्रवारी (दि. ९) प्रभागातील नगरसेवक आणि आमदारांनाही अरेरावीचा अनुभव आला.
तीन दिवसांपूर्वीच केंब्रिज शाळेचे वाढीव शुल्क न भरल्याच्या कारणावरून सुमारे दीडशे विद्यार्थ्यांच्या घरी शाळा सोडल्याचे दाखले पाठवून दिले होते. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पालकांनी लढा अधिक तीव्र करत शुक्रवारी (दि. ९) सकाळपासून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले होते. घटनास्थळी नगरसेवक सतीश सोनवणे, सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी, श्याम बडोदे, सुनील खोडे यांनी पालकांसह ट्रस्टी आणि मुख्याध्यापक यांच्याशी चर्चेने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रशासनाकडून अरेरावी करण्यात आली. दुपारी पुन्हा प्रभागाचे नगरसेवक, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरेंसह ट्रस्टी व मुख्याध्यापकांशी चर्चा करण्यास गेले असता त्यांनाही पुन्हा प्रशासनाकडून अरेरावी करण्यात आली.
आमदार देवयानी फरांदे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये यांना तातडीने शाळेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी (दि. १०) सकाळपासून विद्यार्थी आणि पालकांची साक्ष घेण्यात आली. तसेच सुरक्षारक्षकांविरुद्ध असलेल्या तक्रारीनुसार पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासमोर तपासणी करण्यात आली. तसेच संबंधित तिघांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. त्यांनी तपासासाठी सहकार्य न केल्यास त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.