एसटीचा संप मिटला : बारा वाजेपासून नाशिकची ‘लाईफलाईन’ होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 22:41 IST2018-06-09T22:41:59+5:302018-06-09T22:41:59+5:30
रात्री बारा वाजता नाशिकची ‘लाईफलाईन’ मानली जाणारी लालपरी पुन्हा रस्त्यावर धावणार आहे.

एसटीचा संप मिटला : बारा वाजेपासून नाशिकची ‘लाईफलाईन’ होणार सुरू
नाशिक : दोन दिवसांपासून थबकलेली एस.टीची चाके फिरण्याचा मार्ग रात्री दहा वाजेनंतर मोेकळा झाला. बसचालक-वाहकांनी संप मागे घेतल्याची घोषणा परिवहन मंत्र्यांच्या बैठकीनंतर करण्यात आली. बारा वाजेपासून शहर बससेवा पुर्ववत होणार असल्याची माहिती परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या व्यवस्थापनाने दिली आहे.
जुने मध्यवर्ती व नवीन मध्यवर्ती बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, निमाणी बसस्थानकांमध्ये प्रवाशांची वर्दळ जरी दिसून आली तरी बसेस मात्र दिसेनाशा झाल्या होत्या. अर्धा पाऊण तासांच्या अंतरानंतर एखादी शहर बसस्थानकामध्ये येत होती. खासगी वाहतुकदारांना प्रवासी वाहतुकीचा ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याने थेट बसस्थानकाच्या आवारात खासकी वाहतुकदारांनी जीप, रिक्षांसह अन्य प्रवासी वाहने उभी करुन वाहतूक सुरू केल्याचे चित्र शनिवारी दिवसभर पहावयास मिळाले. बसस्थानकांच्या आवारात शुकशुकाट पहावयास मिळत होता. रिक्षाथांबे, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस, जीप, टॅक्सीच्या थांब्यांवर प्रवाशांची गर्दी दिसून आली. एकूणच दिवसभर लाल परी रस्त्यावरुन जणू अदृश्य झाली होती; मात्र रात्री बारा वाजता नाशिकची ‘लाईफलाईन’ मानली जाणारी लालपरी पुन्हा रस्त्यावर धावणार आहे.