शहरात पावसाची जोरदार हजेरी : तारांबळ
By Admin | Updated: June 11, 2017 20:42 IST2017-06-11T20:42:01+5:302017-06-11T20:42:01+5:30
पाच दिवसांनंतर रविवारी (दि.११) शहरात दुपारी चार वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली

शहरात पावसाची जोरदार हजेरी : तारांबळ
नाशिक : पाच दिवसांनंतर रविवारी (दि.११) शहरात दुपारी चार वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड तासात शहरातील हवामान केंद्रात २६ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांसह विक्रेत्यांची तारांबळ उडाली.
चार दिवसांनंतर उन्हाळी सुटी संपणार असून, शाळांची पहिली घंटा वाजणार आहे. शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ रविवारच्या सुटीच्या मुहूर्तावर गजबजली होती. मेनरोड, शालिमार, एम.जी.रोड, आदि परिसरात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याबरोबरच रमजान पर्वदेखील दुसऱ्या टप्प्यात आल्यामुळे मुस्लीम बांधवांनीही खरेदीसाठी बाजारपेठेकडे पावले फिरविल्याचे चित्र होते. दुपारी आलेल्या पावसाने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेला माल सुरक्षितरीत्या प्लॅस्टिक कापडाने झाकून ठेवताना गोंधळ झाला.
रविवारी सकाळपासून वाऱ्याचा वेग मंदावला होता. तसेच शहरात ढगाळ हवामान असल्यामुळे नाशिककरांना उकाडा जाणवत होता. दुपारी बारा वाजेपासूनच नागरिकांमध्ये आज पाऊस जोरात येणार असल्याची चर्चा रंगली होती. पावसाची आस प्रत्येकाला लागून होती. दुपारी चार वाजता पावसाला सुरुवात झाली. शहरासह इंदिरानगर, नाशिकरोड, पंचवटी, सिडको, सातपूर, मखमलाबाद, वडाळागाव, डीजीपीनगर, अशोका मार्ग आदी उपनगरीय परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.