Strict closure of ration shopkeepers | रेशन दुकानदारांचा कडकडीत बंद

रेशन दुकानदारांचा कडकडीत बंद

नाशिक : रेशन दुकानदारांना विम्याचे संरक्षण मिळावे त्याचबरोबर अन्य मागण्या मान्य कराव्यात यासाठी सोमवार (दि. १) पासून जिल्ह्यातील रेशन दुकाने बेमुदत बंद ठेवण्यात आले आहेत. जोपर्यंत शासन मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय दुकानदार संघटनेने घेतला आहे.
राज्यात कोरोना वायरसमुळे पाच दुकानदाराचा मृत्यू झाला असल्याने रेशन दुकानदारांचे आरोग्य नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे शासनाने अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे रेशन दुकानदारांना ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे तसेच एप्रिल, मे, जून महिन्यासाठी मोफत दिलेले तांदूळ व दाळ विक्रीचे कमिशन त्वरित देण्यात यावे, जोपर्यंत कोरोनाचा पूर्णपणे नायनाट होत नाही तोपर्यंत कार्डधारकांचे ई-पॉश मशीनवरचा अंगठा न घेता त्याच्या नॉमिनीचा अंगठा घेण्याचा आदेश देण्यात यावा, तामिळनाडूमध्ये रेशन दुकानदारांना दिल्या जाणाºया मानधनाप्रमाणे राज्यातील दुकानदारांना मानधन देण्यात यावे आदी मागण्या दुकानदार संघटनेने केली आहे.
ज्या दुकानदारांकडून मोफत धान्याचे वितरण अद्याप झालेले नाही, अशांनी काहीकाळ दुकान सुरू ठेवून धान्याचे वाटप केले व त्यानंतर संपात सहभागी झाले आहेत. शासनाने रेशन दुकानदारांच्या मागण्यांचा विचार करून त्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा संप सुरूच राहील असे जिल्हा अध्यक्ष निवृत्ती कापसे, गणपतराव डोळसे, दिलीप तुपे, सतीश आमले, महेश सदावर्ते, दिलीप मोरे, लता वालझाडे, सोनिया आमले आदींनी जाहीर केले आहे.
-----------------
चलन भरणे बंद
सरकारने मागण्या मान्य न केल्यास ३१ मेपासून दुकानदारांनी जून महिन्याचे धान्य उचलण्यासाठी चलन भरणे बंद केले होते. त्याचाच भाग म्हणून सोमवारपासून बेमुदत रेशन दुकानदारांनी बंद पुकारला आहे. जिल्ह्यात २६०० रेशन दुकाने आहेत.

Web Title: Strict closure of ration shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.