अपुऱ्या मनुष्यबळामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:26+5:302021-05-10T04:14:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : तालुक्यातील वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरे कर्मचारी असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांकडून काम करुन घेताना वैद्यकीय ...

Stress on medical staff due to insufficient manpower | अपुऱ्या मनुष्यबळामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण

अपुऱ्या मनुष्यबळामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण

लोकमत न्यूज नेटवर्क

सिन्नर : तालुक्यातील वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरे कर्मचारी असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांकडून काम करुन घेताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. २३ गावांमधील ४० हजार लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या वावी प्राथमिक आरोग्य केंद्रावरील कोरोनासारख्या महामारीच्या साथीसह लसीकरण व आरोग्याच्या विविध कामांचा वाढता ताण वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तोकड्या कर्मचाऱ्यांना अडचणीत आणणारा ठरत आहे.

वावी प्राथमिक आरोग्य केेंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या सहा उपकेंद्रांमधील एकूण ३५ जागांपैकी १३ जागा रिक्त आहेत. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील व सिन्नर-शिर्डी महामार्गावरील वावी प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वूपर्ण मानले जाते. वावी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा उपकेंद्र येतात. वावी-१, वावी-२, पांगरी, मऱ्हळ, मीरगाव व पाथरे या सहा उपकेंद्रातही कर्मचारी संख्या कमी असल्याने त्याचा वाढता ताण वावी प्राथमिक केंद्रावर पडत आहे. कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, सर्वप्रकारच्या आजारांचे रुग्ण, पोलिओ लसीकरण, काेरोना प्रतिबंधात्मक लसीकरण, गरोदर माता तपासणी, आशा कार्यकर्त्यांच्या बैठका, दररोजची रुग्ण तपासणी, कोरोना सर्वेक्षण, कन्टेनमेंट झोन, व्हिडीओ कॉन्फरन्स आदींसह आरोग्य खात्याच्या वाढत्या कामामुळे येथील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आठ तासांऐवजी १८ तास काम करण्याची वेळ आली आहे.

वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कागदोपत्री कार्यरत आहेत. त्यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर पाठविल्याने एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर २३ गावांचा कारभार सांभाळण्याची वेळ आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकाऱ्याची जागा असून, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या दोन्ही जागांवर अधिकारी नाहीत. बाह्यरुग्ण विभागातील आरोग्यसेविका व आरोग्य सहाय्यिका यांची प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. आरोग्य सहाय्यकाच्या दोन जागांवर केवळ एकच कर्मचारी कार्यरत आहे. वावी - १, वावी - २ व पांगरी उपकेंद्रात आरोग्यसेविकांच्या तीन जागा रिक्त आहेत. मीरगाव व मऱ्हळ येथील उपकेंद्रात आरोग्यसेवकाची प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. चार शिपायांचे कामही दोन कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. कनिष्ठ सहाय्यकची जागाही रिक्त असल्याने त्याचे कामही वैद्यकीय अधिकाऱ्यांना करावे लागत आहे.

वावी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वावी, मिठसागरे, फुलेनगर, दुसंगवाडी, कहांडळवाडी, मलढोण, घोटेवाडी, वल्हेवाडी, सायाळे, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, कोळगावमाळ, मीरगाव, पिंपरवाडी, पांगरी बुद्रुक, पांगरी खुर्द, भोकणी, मऱ्हळ बुद्रुक, मऱ्हळ खुर्द, सुरेगाव, गुलापूर व निऱ्हाळे ही २३ गावे येतात. या गावांमधील ग्रामस्थांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी पेलताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

चौकट-

औषध निर्माण अधिकारी नसल्याने कोणीही देते औषधे

वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकाऱ्याची जागा गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर लिहून दिलेल्या गोळ्या-औषधे देण्याचे काम आरोग्यसेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेवक तर वेळप्रसंगी शिपायालाही करावे लागते. जे कर्मचारी डयुटीवर हजर असतील त्यांच्याकडून ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडून घ्यावी लागत आहे.

कोट...

प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतील १३ जागा रिक्त असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा जादा ताण येत आहे. कोरोना प्रतिबंधनात्मक लसीकरणासाठी २३ गावांमधील ग्रामस्थ व स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे सारखे फोन येतात. एक दिवसही सुट्टी घेता येत नाही. याठिकाणी कामाचा अतिरिक्त ताण असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना मानसिक दडपणाखाली काम करण्याची वेळ आली आहे.

- डॉ. छाया राशीनकर (खाटेकर), वैद्यकीय अधिकारी, वावी

इन्फो...

वीज गेल्यानंतर निर्माण होते अंधाराचे साम्राज्य

वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात इन्व्हर्टर किंवा जनरेटर नाही. त्यामुळे रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अंधाराचे साम्राज्य पसरते. रात्री प्रसुतीसाठी महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्यास होणारी गैरसोय ही प्रसुती वेदनेइतकीच त्रासदायक ठरते.

इन्फो...

आरोग्य केंद्राची वाट खडतर

वावी प्राथमिक आरोग्य केंद्र घोटेवाडी रस्त्याला आहे. समृध्दी महामार्गाच्या कामामुळे या रस्त्यावर दररोज शेकडो डंपरसह अवजड वाहनांची वर्दळ सुरु असते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. मोठमोठ्या खड्डयांसह धुळीचे साम्राज्य या रस्त्यावर असते. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पायी जातानाही रुग्णासह नातेवाईकांना अडचणीचा सामना करावा लागतो.

इन्फो...

३ हजार नागरिकांचे लसीकरण

वावी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २३ गावे येत असून, सुमारे ४० हजार लोकसंख्या आहे. १० मार्चपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीला पोलीस, आरोग्य कर्मचारी, महसूल कर्मचारी, शिक्षक यांच्यासह फ्रंटलाईन वर्कर यांना लसीकरण करण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, त्यानंतर ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांना लसीकरण करण्यात आले. आत्तापर्यंत वावी प्राथमिक आरोग्य केंद्राने वावी, भोकणी, पांगरी, पाथरे, मऱ्हळ, घोटेवाडी, फुलेनगर, पिंगरवाडी, मीरगाव या गावांमध्ये लसीकरणासाठी शिबिरे घेतली आहेत. सुमारे ३ हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया राशीनकर (खाटेकर) यांनी दिली.

इन्फो...

वावी प्राथमिक आरोग्य केंद्र दृष्टीक्षेपात

एकूण लोकसंख्या - ४० हजार

एकूण गावे - २३

उपकेंद्र - ०६

वैद्यकीय अधिकारी - ०२

एकूण जागा - ३५

रिक्त जागा - १३

फोटो- ०९ वावी हेल्थ सेंटर

वावी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत

===Photopath===

090521\09nsk_10_09052021_13.jpg

===Caption===

वावी आरोग्य केंद्र

Web Title: Stress on medical staff due to insufficient manpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.