आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 00:52 IST2021-04-11T21:42:19+5:302021-04-12T00:52:21+5:30
देवळा : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत असून आरोग्य विभागाचा कर्मचारी वर्ग त्यासाठी अपुरा पडू लागला आहे. त्यातच आरोग्य विभागाचे २७ कर्मचारी कोरोना बाधित झाल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

देवळा शहरातील सुनसान पाच कंदील चौक.
देवळा : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत असून आरोग्य विभागाचा कर्मचारी वर्ग त्यासाठी अपुरा पडू लागला आहे. त्यातच आरोग्य विभागाचे २७ कर्मचारी कोरोना बाधित झाल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
आरोग्य विभागाला तालुक्यातील इतर शासकीय विभागांनी मदत करावी असा आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढला आहे. काही विभागांचा अपवाद वगळता इतर विभागांनी आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असून कोणत्याही क्षणी आरोग्य विभाग व्हेंटीलेटरवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देवळा तालुक्यात दहा दिवस जनता कर्फ्यु पुकारूनही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली नाही. ह्या काळात १०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण दररोज सापडत होते. तालुक्याची कोरोनाचा विस्फोट होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या व होम क्वारंटाइन केलेल्या अनेक व्यक्तीचा गावागावात मुक्त संचार सुरू असून स्प्रेडरची भुमिका बजावत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ह्या बेफिकीर नागरीकांना शिस्त लावण्यासाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा दिसून येत नाही, त्यातच अनेक गावांमध्ये कोरोनाप्रती स्थानिक प्रशासनाची दिसून आलेली निष्क्रियता देखील कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.
उपविभागीय अधिकारी यांनी ५ एप्रिल रोजी तालुक्यातील इतर शासकीय विभागांनी आरोग्य विभागाला मदत करावी असा आदेश काढूनही अपवाद वगळता इतर विभागांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी यापूर्वी कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्व शासकीय विभागांची बैठक घेऊन त्यांना एकमेकांशी योग्य समन्वय साधत काम करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु अपेक्षित परीणाम दिसून आला नाही.आमदार आहेर यांनी यात लक्ष घालून कामचुकारपणा करणाऱ्या विभागांना समज द्यावी अशी मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे.
देवळा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून अनेक तरूण व घरातील कर्ते पुरूष कोरोनाला बळी पडले आहेत. अनेक गावात शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब बाधित होत आहेत. हे पूर्ण कुटुंब बाधित झाल्यानंतर त्यांना उपचार घेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यामुळे शेतातील पाळीव जनावरांना चारा पाणी करण्यास देखील घरात कोणी नाही, यामुळे जनावरांची उपासमार होत आहे. कोरोनाच्या भितीमुळे आजुबाजूचे शेतकरी देखील जनावरांना चारा पाणी करण्यास धजावत नसल्याचे चित्र काही गावात दिसून आले आहे.
मास्कचा वापर, स्वच्छता, व सामाजिक अंतर हया त्रिसुत्रीचे पालन करावे, कोरोना रुग्णांनी १४ दिवस घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी केले आहे.
तालुका-देवळा
दिनांक-११/४/२१ सायंकाळी-५ वाजता
१ तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या - ३९५२
२ शनिवारी आढळून आलेले नवीन रूग्ण - १२८
३ नगरपरिषद क्षेत्र - १००७
४ ग्रामपंचायत क्षेत्र - २९४५
५ बरे झालेली एकुण रुग्णसंख्या - २९६२
६ आज बरे झालेली रुग्णसंख्या - १५८
७ एकुण मृत्यू - ३७
८ आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या
९ उपचारखालील रुग्ण - ९५३
१० सीसीसी येथे दाखल - १७
११ डीसीएचसीयेथे दाखल - २९
१२ डीएचएस येथे दाखल - ०२
१३ खाजगी रुग्णालयात दाखल - ४१
१४ गृह विलगिकरणात असलेले - ८६४