कळवण : कळवण नगरपंचायत हद्दीतील शिवाजीनगर येथील डॉ. सुभाषचंद्र न्याती हॉस्पिटल ते हनुमान मंदिर या रस्त्यावरील बी. के. कॉम्प्लेक्सजवळ उभे असलेले रोहित्र रस्त्यांच्या विकासाला डोकेदुखी ठरत असून, ते हटवावे, अशी अपेक्षा मागणी नागरिकांनी केली आहे.नगरपंचायत असलेल्या कळवण शहराचा दिवसागणिक विस्तार वाढत आहे. त्यामानाने शहराच्या लोकसंख्येतही वाढ झाली आहे. शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर वाहतुकीला वीज वितरण कंपनीने वीजपुरवठ्यासाठी उभारलेले विजेचे खांब व रोहित्र हे अडथळा ठरू पाहत असल्याने त्यांचे सर्वेक्षण करून सदर खांब व रोहित्र हटविण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाजीनगरमधील बी. के. कॉम्प्लेक्ससमोर उभे असलेले रोहित्र वाहतुकीला अडचणीचे ठरत आहे. रोहित्र अगदी रस्त्यावरच असल्याने जवळून जातानादेखील जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. तेथून जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी मंगल कार्यालयात लग्न व अन्य कार्याच्या वेळी आलेले पाहुणे रोहित्राभोवतीच वाहने लावत असल्याने येथे दुतर्फा वाहतुकीची कोंडी होते. येथूनच पुढे असलेल्या डॉ. वाघ हॉस्पिटलजवळ हीच स्थिती आहे. शिवाजीनगरमधील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम नगरपंचायतने हाती घेतले असून रस्त्यांच्या रुंदीकरणास अडथळे ठरू पाहत असलेले रोहित्र व वीजखांब वीज वितरणने अन्यत्र हलवावे, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे .डॉ. वाघ हॉस्पिटलसमोर रामदास दशपुत्रे यांचे दुकान व घराच्या बांधकामामुळे रस्ता अतिशय अरुंद स्वरूपाचा झाला आहे. एकाच वेळी दुसरे वाहन पास होणे दुरापास्त आहे. येथील औषध दुकानाजवळील एकूण चार वीजखांब वाहतुकीला अडचणीचे ठरत आहे. याच रस्त्यावर पुढे जवळपास ५ ते ६ खांब आहेत. सिद्धिदाता हॉस्पिटलमध्ये तातडीचे रुग्ण आल्यानंतर अरुंद झालेल्या रस्त्यामुळे व विजेच्या खांबांमुळे वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहे. हॉस्पिटलसमोर रुग्णांची त्यांच्या नातेवाइकांची वाहने रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे वाहनचालकांना तेथून मार्ग काढणे अवघड होत आहे. दुरून दुसऱ्या मार्गाचा अवलंब करीत वाहनधारकांना मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने नियोजन करून अडथळा निर्माण करणाऱ्या वीजखांबांचे सर्वेक्षण करून येथील ते इतरत्र हलवावे तसेच येथील अनावश्यक विजेचे खांब कमी करता येणे शक्य असल्याने या कामात यंत्रणेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सिद्धिदाता हॉस्पिटलच्या पुढे कलावती मंदिराकडे जाताना रस्त्याच्या बाजूला रोहित्र उभे असून, त्या समोरील मालपुरे बंधंूनी रस्त्यावरच घरे बांधली असल्याने रोहित्र आणि अतिक्रमित घरामुळे रस्ता अरुंद झाला आहे. एकाच वेळी दोन वाहने पास होणे अवघड झाले आहे. रस्त्याला लागूनचे रोहित्र असल्याने भीती वाटते. हे रोहित्र डोकेदुखी ठरत आहे. उपयुक्त नसलेले वीज खांबही अजूनही ‘जैसे थे’ उभे आहेत.शहरातील अनेक ठिकाणच्या खांबांची दुरवस्था झाली आहे. काही खांब वाकले आहेत, तर काही जीर्ण झाले आहेत. शहरात सर्वत्र सीमेंटचे जंगल (घर, बंगले) झाल्याने रस्तेदेखील सीमेंटची झाली आहेत. पर्यायाने रस्त्यांची उंची वाढल्याने शहरात वीजपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या वीज तारा खाली आल्या आहेत. त्यामुळे कळवण शहरातील विविध भागांचे वीज वितरण कंपनीने सर्वेक्षण करून उपाययोजना केली तर बहुतांशी विजेचे खांब काढता येणे शक्य असल्याचे मत कळवणकरांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)
वीज खांबांमुळे वाहतुकीला अडथळा
By admin | Updated: April 30, 2017 00:38 IST