राष्ट्रवादीचा रास्ता रोको फसला
By Admin | Updated: June 19, 2015 00:03 IST2015-06-18T23:54:27+5:302015-06-19T00:03:27+5:30
चोख बंदोबस्त : अनेकांना घेतले ताब्यात

राष्ट्रवादीचा रास्ता रोको फसला
नाशिक : माजी सार्वजनिक राज्यमंत्री व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ त्यांचे समर्थक पक्षाचे झेंडे घेत गुरुवारी (दि.१८) द्वारका चौफुलीवर रास्ता रोको करण्यासाठी आले; मात्र पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. कार्यकर्त्यांच्या दुप्पट पोलिसांचा फौजफाटा असल्यामुळे ‘रास्ता रोको’ करण्याची कुठलीही संधी आंदोलकांना मिळू शकली नाही.
कार्यकर्त्यांनी द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी धाव घेतली; मात्र त्यांच्या अगोदरपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त येथे तैनात होता. चौफुलीवर एकत्र येणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या प्रारंभी पोलिसांची फौज उभी असल्यामुळे सुमारे दीड तास उशिराने आंदोलनकर्ते द्वारकेवर आले. परंतु, पोलिसांनी
कु ठल्याही बाजूने त्यांना रास्तो रोक ोचा करू दिला नाही. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत तयार ठेवण्यात आलेल्या वाहनांमध्ये बसवून भद्रकाली पोलीस ठाण्यात रवाना केले. नगरसेवक संजय साबळे यांच्यासह पोलिसांनी वीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, धरपकड सुरू असताना अन्य कार्यकर्त्यांनी लाठ्यांचा प्रसाद खाण्याऐवजी धूम ठोकणे पसंत केले. सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, रवींद्र वाडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी रास्ता रोको आंदोलन पूर्णपणे उधळून लावले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी टळली व सर्वसामान्य नागरिकांची गैरसोयीपासून सुटका झाली. (प्रतिनिधी)