विंचूरला इंधन दरवाढ विरोधात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 00:51 IST2021-02-12T22:04:49+5:302021-02-13T00:51:07+5:30
विंचूर : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील येथील तीन पाटी भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

विंचूरला इंधन दरवाढ विरोधात रास्ता रोको
विंचूर : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील येथील तीन पाटी भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. सकाळी साडेदहाच्या सुमारास रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास रास्ता रोको झाल्याने नाशिक औरंगाबाद महामार्गावर दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती. पेट्रोलचे भाव शंभरीकडे गेले. घरगुती गॅस महागले असून, सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. डॉलरचे भाव कमी झाले असले तरी पेट्रोलचे भाव मात्र गगनाला पोहोचले असून, याचा निषेध म्हणून सरकारला जाब विचारण्यासाठी रास्ता रोको करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी सांगितले. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंमध्ये वाढ झाली आहे. केंद्र सरकारने केलेली इंधन दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचविणारी असून, इंधन दरवाढीवर केंद्राचे कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याने केंद्र शासन गरीब, शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्याची टीका तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे यांनी केली. मुंबई कृ.उ.बा समितीचे संचालक जयदत्त होळकर, युवानेते रणजित गुंजाळ यांसह पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. केंद्र शासनाने इंधन दरवाढ मागे घ्यावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल,अशा आशयाचे निवेदन प्रशासनाच्या वतीने तलाठी शिर्के यांनी स्वीकारले.
आंदोलनात दत्तात्रय डुकरे, बाळासाहेब लोखंडे, भाऊसाहेब भवर, राजेंद्र बोरगुडे, पांडुरंग राऊत, विलास गोरे, सचिन दरेकर, नानासाहेब जेऊघाले, रणजित गुंजाळ, आत्माराम दरेकर, ललित दरेकर, बबनराव शिंदे, सोहेल मोमीन, इस्माईल मोमीन, महेंद्र पुंड, जयंत साळी, अनिल विंचूरकर, ज्ञानेश्वर शेवाळे, किरण भोसले, मोसीन शेख,अविनाश सालगुडे, संतोष राजोळे सहभागी झाले होते. लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.