नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर किसान सभेचा रास्ता रोको
By Admin | Updated: September 2, 2015 23:40 IST2015-09-02T23:39:57+5:302015-09-02T23:40:55+5:30
नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर किसान सभेचा रास्ता रोको

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर किसान सभेचा रास्ता रोको
सातपूर : भाजपा नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा व नाशिक जिल्हा किसान कौन्सिलच्या वतीने नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वासाळी फाट्यावर हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार शेतकरी व शेतमजूर, संघटित, असंघटित कामगार यांच्या विरोधात काम करीत आहे. महागाई, बेरोजगारीला चालना, प्रतिगामी भूमी अधिग्रहण विधेयक, कामगार कायद्यातील घातक बदल, अन्न सुरक्षेकडे दुर्लक्ष, वनाधिकार कायद्याला स्थगिती, सर्वसमाज कल्याण सेवांवर संक्रांत आणण्याचे काम करीत आहे. गेल्या वर्षभरात देशात २३ टक्के तर राज्यात ४0 टक्के शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. या धोरणांचा विरोध करण्यासाठी राज्य किसान सभेचे सरचिटणीस किसन गुजर यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनात बाबूराव धोंगडे, रामनाथ घोटे, सुनील गायकवाड, रखमा नामाडे, मनीषा कांबळे, तानाजी बेंडकुळे, चंदर पाडेकर, लक्ष्मी धोंगडे, निवृत्ती निंबेकर आदिंसह खेड्यापाड्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)
आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई
या रास्ता रोको आंदोलनात नाशिक तालुक्यातील दहेगाव, तळेगाव, जातेगाव, बेळगाव ढगा, गंगावऱ्हे, गणेशगाव, पिंपळगाव गरुडेश्वर यासह खेड्यातील शेतकऱ्यांसह महिलादेखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
या आंदोलनामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
रास्ता रोको आंदोलनकर्त्यांवर सातपूर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून समज देऊन सोडून दिले.