गाळेधारक गाळात, रस्त्यावरील जोमात

By Admin | Updated: September 2, 2015 23:31 IST2015-09-02T23:31:15+5:302015-09-02T23:31:50+5:30

साधुग्राम : महापालिकेने विक्रेत्यांना सोडले वाऱ्यावर

Steeplechase, street accent | गाळेधारक गाळात, रस्त्यावरील जोमात

गाळेधारक गाळात, रस्त्यावरील जोमात

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवनातील साधुग्राममध्ये व्यवसायाची पर्वणी साधू पाहणाऱ्या गाळेधारकांची प्रचंड निराशा झाली असून, अधिकृतपणे लिलावात सहभागी होत लाखाने पैसे मोजत गाळे घेतलेल्या व्यावसायिकांना महापालिकेने वाऱ्यावर सोडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. साधुग्राम परिसरात अनधिकृतपणे रस्त्यांवर दुकाने थाटून बसलेल्या विक्रेत्यांकडे महापालिकेचा अतिक्रमण विभाग सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याने ‘गाळेधारक गाळात आणि रस्त्यावरील विक्रेते जोमात’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या तीनही पर्वणीकाळात कोट्यवधी भाविक नाशिकला दाखल होणार असल्याचा डांगोरा पिटत महापालिकेने साधुग्राम, तसेच वाहनतळांवर व्यावसायिकांना गाळे उपलब्ध करून देत व्यवसायाची पर्वणी साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यानुसार साधुग्राममध्ये महापालिकेने १३८ गाळे उभारले आणि त्यांची लिलावप्रक्रिया राबविली. त्यानुसार ९४ गाळ्यांचा लिलाव होऊन महापालिकेच्या खजिन्यात सुमारे ३९ लाख रुपयांचा महसूल जमा झाला.
साधुग्राममध्ये भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी राहणार असल्याने व्यावसायिकांनी लाखाच्या वर बोली बोलत गाळे ताब्यात घेतले. एका गाळ्याला तर २ लाख ६३ हजार रुपयांची बोली लावली गेली. त्यातूनच साधुग्राममध्ये मोठी आर्थिक उलाढाल होण्याचे संकेत मिळाले होते. १ आॅगस्टपासून व्यावसायिकांनी गाळ्यांमध्ये आपला माल लावत व्यवसाय सुरू केला. मात्र, पहिल्या पर्वणीला दोन-तीन दिवस वगळता व्यावसायिकांचा अपेक्षित व्यवसाय होऊ शकला नाही. अधिकृतपणे गाळे घेऊन व्यवसाय एकीकडे थाटले गेले असताना दुसरीकडे मात्र साधुग्राममधील रस्त्यांवर अनधिकृतपणे अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम अधिकृत गाळेधारकांच्या व्यवसायावर होत आहे. साधुग्राममधील रस्त्यांवर कोणालाही व्यवसाय करू दिला जाणार नाही, असे महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सांगण्यात आले होते. त्यानुसार सुरुवातीला दोन-तीन दिवस महापालिकेच्या पथकाने कारवाई केलीही; परंतु आता महापालिकेच्या पथकांतील कर्मचाऱ्यांकडून चिरीमिरी घेत रस्त्यांवरील विक्रेत्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप गाळेधारकांकडून होत आहे. सदर पथक केवळ वाहन लावून गंमत पाहत असल्याचेही म्हटले जात आहे. याबाबत गाळेधारकांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली गेली नसल्याचेही व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

अनेक गाळे वीजजोडणीविनाच

महापालिकेने व्यावसायिकांना केवळ गाळे उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, व्यवसायासाठी लागणाऱ्या अन्य सर्व परवानग्या संबंधित व्यावसायिकांनीच मिळवायच्या, असे लिलावप्रक्रियेच्या वेळीच नमूद करण्यात आले होते. त्यानुसार विक्रेत्यांनी परवानग्या मिळविल्याही मात्र महावितरण कंपनीकडून सुमारे २५ हजार रुपयांची अनामत रक्कम मागितली गेल्याने अनेकांनी वीजजोडणीवर खर्च करूनही जोडणी न घेणे पसंत केले. त्यामुळे अनेक गाळ्यांमध्ये बॅटरीच्या माध्यमातून दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Steeplechase, street accent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.