परीक्षा शुल्क प्रकरणी राज्य शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:08 IST2018-01-28T23:47:56+5:302018-01-29T00:08:44+5:30
शिक्षक भरतीतील चाचणी परीक्षेत भटक्या विमुक्त संवर्गातील उमेदवारांकडून शुल्क वसूल करून अन्याय करण्यात येत असल्याने भटके विमुक्त समाजाच्या वतीने राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.

परीक्षा शुल्क प्रकरणी राज्य शासनाचा निषेध
नाशिक : शिक्षक भरतीतील चाचणी परीक्षेत भटक्या विमुक्त संवर्गातील उमेदवारांकडून शुल्क वसूल करून अन्याय करण्यात येत असल्याने भटके विमुक्त समाजाच्या वतीने राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. राज्य शासनाने शिक्षणसेवक पदासाठी शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरिता भटक्या विमुक्त संवर्गातील उमेदवारांकडून सर्वसाधारण उमेदवारांप्रमाणेच शुल्क वसूल करून अन्याय केला आहे, तर त्याऐवजी भटक्या विमुक्तांना शुल्कामध्ये सवलत देणे बंधनकारक होते. या अन्यायाविरोधात आडगाव नाका येथील श्रीराम मित्रमंडळ संचलित, प्राथमिक व माध्यमिक शाळेत झालेल्या बैठकीत भटक्या विमुक्तांकडून शासनाच्या या धोरणाचा जाहीर निषेध करण्यात आला. या बैठकीस हेमंत शिंदे, जी. जी. चव्हाण, डी. के. गोसावी, कल्पना पांडे, दत्तात्रय सांगळे, देवीदास गिरी, धर्मराज काथवटे, गिरीश मोहिते यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीच्या वेळी प्रदीप बडगे, अॅड. अमोल घुगे, रामेश्वर साबते, हिमांशू चव्हाण, भालचंद्र निरभवणे, सुरज काळे, आदींसह नागरिक उपस्थित होते. भटक्या विमुक्तांकडून अनुसूचित जाती, जमातीप्रमाणेच ५0 टक्के परीक्षा शुल्क आकारले जाते, असे असताना नुकत्याच झालेल्या शिक्षणसेवक पदाच्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी सर्वसाधारण उमेदवारांप्रमाणेच ५०० रुपये शुल्क आकारले गेले. शासनाने या चाचणी परीक्षेची फी आॅनलाइन पद्धतीने घेतलेली आहे. भटक्या विमुक्तांकडून घेतलेली वाढीव परीक्षा शुल्क शासनाने आॅनलाइन पद्धतीने परत करावी, अशी सर्वांनी या बैठकीत मागणी केली आहे.