Nashik Kumbh Mela News: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्य सरकार प्रत्यक्ष फिल्डवर उतरले असून, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (दि. २८) नाशिकसह त्र्यंबकेश्वर या कुंभस्थानी भेटी देत साधू महंतांसह जिल्हा प्रशासनासमवेत नियोजनाच्या दृष्टीने आढावा घेतला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी रात्रीच त्र्यंबकेश्वर गाठत तेथील विविध आखाडांच्या साधू महंतांशी चर्चा केली होती, तर शुक्रवारी सकाळी साधू-महंतांना सोबत घेत त्र्यंबकेश्वर येथील विविध ठिकाणांची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी नगरपरिषदेत आढावा बैठक झाली.
हेही वाचा >'कुंभमेळ्यासाठी प्रशासन अनधिकृत व्यक्तींशी...', महंत राजेंद्र दास यांचा गंभीर आरोप
त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणान्या साधू-महंतांसह भाविकांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेता, कुशावर्त तीर्थांप्रमाणेच नवीन कुंडाची उभारणी तसेच सात किलोमीटरच्या घाटांची निर्मितीकरण्यात येईल. गोदावरीचा प्रवाह अडवणारी सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात येतील.
कुंभमेळ्याच्या योग्य नियोजन आणि सुविधानिर्मितीसाठी आवश्यक असणारी जमीन संपादित केली जाईल. गोदावरीचा प्रवाह अद्रवणारी सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात येतील. कुंभमेळ्याच्या योग्य नियोजन आणि सुविधानिर्मितीसाठी आवश्यक असणारी जमीन संपादित केली जाईल. गोदावरी नदी वाहती राहण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
कोणत्या मुद्द्यांबद्दल झाली चर्चा?
त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्ताप्रमाणेच नवीन कुंडांची तसेच गोदाकाठी घाटांची निर्मिती. कुशावर्त तीर्थापासून गायत्री मंदिरापर्यंत गोदावरीवरील सिमेंट काँक्रीटचा स्लॅब हटविणार, गोदावरीच्या प्रवाहाला अडथळे ठरणारी अतिक्रमणे काढणार, मलनिस्सारण व घनकचरा (एसटीपी) प्रकल्प लवकरच कार्यान्वित करणार.
साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा संपादित करणार
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत साधुग्रामसाठी जादा जागा संपादित करण्याची मागणी झाल्यानंतर पुरेशी जागा संपादित करण्याचे आश्वासन मंत्री गिरीष महाजन यांनी दिले. भक्तिचरणदास महाराज यांनी भूसंपादनासह विविध प्रश्न उपस्थित केले.
मुख्यमंत्र्यांसह नाशिकच्या साधूंची लवकरच बैठक
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक दौऱ्यात त्र्यंबक येथे साधुंची भेट घेतली, परंतु नाशिकच्या साधूना वेळ दिला नाही, असा सूर निघाल्यानंतर लवकरच अशी भेट घडवून आणली जाईल, असे आश्वासन गिरीष महाजन यांनी दिले.
सुधीर पुजारी, अनिकेतशास्त्री अनुपस्थित
महंत सुधीरदास पुजारी आणि अनिकेतशास्त्री देशपांडे यांचा आखाड्यांशी संबंध नसून त्यांना बैठकांपासून दूर ठेवण्याची मागणी करण्यात आली होती, त्यामुळे या बैठकीत त्या दोघांचीही बैठकीला उपस्थिती नसल्याचे दिसून आले.