श्रीमद्भागवत महापुराण चिंतन सप्ताहास प्रारंभ
By Admin | Updated: August 5, 2014 01:47 IST2014-08-05T01:43:01+5:302014-08-05T01:47:17+5:30
श्रीमद्भागवत महापुराण चिंतन सप्ताहास प्रारंभ

श्रीमद्भागवत महापुराण चिंतन सप्ताहास प्रारंभ
नाशिक : येथील श्री संत सेवा संघाच्या वतीने लवाटेनगर येथील लक्षिका मंगल कार्यालयात आयोजित श्रीमद्भागवत महापुराण चिंतन सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी संघाचे संस्थापक संजय गोडबोले गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लक्षिका मंगल कार्यालयाचे संचालक विजय व वृंदा लवाटे, भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, प्रशांत पंचभाई आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संजय गुरुजी म्हणाले, आपल्या भारतीय संस्कृतीचा हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास, साहित्य, पुराणे आजही मनुष्याच्या रोजच्या जीवनाशी थेट नाते सांगतात. सकल मनुष्यप्राणिमात्राच्या कल्याणार्थ रचलेले हे वाङ्मय सार्वकालिक मार्गदर्शी आहे. श्रीमद्भागवत महापुराणामध्ये भगवंताच्या लीलांसोबत अभक्तांना भक्तिमार्गावर, दुर्जनांना सत्पथावर आणणाऱ्या भगवत्भक्तांच्या चरित्राचा अमृतरस ओसंडून वाहत असल्याचेही ते म्हणाले. श्रीमद्भागवत महापुराण हा चिंतन सप्ताह म्हणजे गायन, वादन, नर्तनाच्या आधारे हरिकीर्तन करण्याऐवजी भक्तांच्या जीवनातील तत्त्वाचरण आदिंचे अनुसरण करण्यास प्रेरित करणारी, दुर्बलता, विकृतीवर प्रहार करणारी सुरस आणि सुबोध प्रवचनमाला असल्याचे संजय गुरुजी यांनी सांगितले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या गुरुवार (दि. ७) पर्यंत चालणाऱ्या या प्रवचनमालेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संघाच्या नाशिक विभागप्रमुख गीता केळकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)