कांदा लागवडीऐवजी पेरणीचा फंडा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 01:15 IST2020-11-08T23:29:49+5:302020-11-09T01:15:21+5:30
नायगाव : सतत बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा रोपांची व लागवड केलेल्या कांद्याचे नुकसान होत आहे. लागवडीचा खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी लागवडीऐवजी पेरणीचा फंडा सुरू केला आहे. सिन्नरच्या उत्तर व पश्चिम पट्ट्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.

सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागात छोट्या ट्रॅक्टरच्या साह्याने कांद्याची पेरणी केली जात आहे. वडगाव पिंगळा येथे पेरणीस सुरुवात करताना शेतकरी .
नायगाव : सतत बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा रोपांची व लागवड केलेल्या कांद्याचे नुकसान होत आहे. लागवडीचा खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी लागवडीऐवजी पेरणीचा फंडा सुरू केला आहे. सिन्नरच्या उत्तर व पश्चिम पट्ट्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.
जिल्ह्यात कांद्याचे आगार म्हणून नायगाव खोऱ्याची ओळख आहे. यंदा मात्र खोऱ्यातील कांदा पीक सतत पडणारा पाऊस व बदलणाऱ्या हवामानामुळे पुरता खराब झाला आहे. महागडे कांदा बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी टाकलेली रोपे पूर्णता वाया गेली. शेतातील आर्द्रता व खराब हवामान यामुळे रोपांची उगवणच झाली नाही. लागवड केलेले कांदा पीक पाऊस व हवामानामुळे शेतातच सडले. वारंवार रोपे व कांदा लागवड करूनही खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
कांदा पीक मशागत, लागवड, खते व औषध आदी खर्च करूनही वाया गेल्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याची यंत्राद्वारे पेरणी करण्याची शक्कल लढवली आहे. कमी खर्चात कांद्याचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे प्रत्येक गावात या पेरणीयंत्राला मागणी वाढली आहे. बघता बघता संपूर्ण नायगाव खोऱ्यात कांद्याची लागवड करण्याऐवजी पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. नायगाव खोऱ्याबरोबरच पश्चिम पट्ट्यातील चिंचोली, मोह, वडगाव पिंगळा आदी गावांमध्येही पेरणी करण्यावर शेतकरी भर देताना दिसत आहे. आत्तापर्यंत शेकडो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी पूर्ण पूर्ण झाली आहे.
यावर्षी पाऊस व दूषित हवामानामुळे लागवड केलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून पीक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पेरणीयंत्राच्या साह्याने कांदा पेरणी केल्यास शेतकऱ्यांचा वावरबांधणी, कांदा लागवड, रोपांची निगा आदींसह इतर खर्चाची बचत होत आहे. त्यामुळे कांदा पिकाच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
- अजय हुळहुळे, शेतकरी, वडगाव पिंगळा