गंगा गोदावरी जन्मोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 01:35 IST2019-02-15T01:34:36+5:302019-02-15T01:35:00+5:30
श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ मास जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला आहे. जन्मोत्सवानिमित्ताने सायंकाळी रामकुंडावर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होणार असून, त्यामुळे परिसर उजळून निघणार आहे.

दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या नाशिकच्या जीवनदायिनी गोदावरी नदीचा शुक्रवारी (दि. १५) जन्मोत्सव. त्यानिमित्ताने महापालिकेच्या वतीने गोदापात्र स्वच्छ करण्यात आले.
पंचवटी : येथील श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ मास जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला आहे. जन्मोत्सवानिमित्ताने सायंकाळी रामकुंडावर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होणार असून, त्यामुळे परिसर उजळून निघणार आहे.
श्री गंगा गोदावरी माघ मास जन्मोत्सवानिमित्त वेद विद्यारण्य केसरी वेदभास्कर नारायण शास्त्री केशव देव घनपाठी यांच्या पुण्यस्मरणार्थ संहिता पारायणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. नितीश जागीर व त्यांच्या सहकाºयांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले.
विशेष कार्यक्रमात विश्व कल्याणार्थ पंचदिन साध्य, एकमुखात्मक विष्णू पंचायतन महायज्ञ होईल तर रविवारी सायंकाळी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन संस्थेत महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. शुक्रवारी गंगा-गोदावरी महाआरती व इस्कॉन परिवाराचे हरिनाम संकीर्तन पार पडले.
दैनंदिन कार्यक्रमात गोदामातेची महापूजा व महाआरती, अभिषेक तसेच विनायक गायधनी यांचे गोदापुराण तसेच सायंकाळी चारुदत्त भगत यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम होत आहे. शुक्रवारी सकाळी गोदा जन्माचे कीर्तन व त्यानंतर गोदावरी जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.