भगूर-धामणगाव बससेवा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:31 IST2020-01-15T23:17:55+5:302020-01-16T00:31:53+5:30
भगूर ते धामणगाव एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत एस.टी. महामंडळाने बससेवा सुरू करावी, अशी मागणी देवळाली कॅम्प भाजपने केली आहे.

भगूर-धामणगाव बससेवा सुरू करा
भगूर : येथील बसस्थानकातून भगूर ते धामणगाव एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत एस.टी. महामंडळाने बससेवा सुरू करावी, अशी मागणी देवळाली कॅम्प भाजपने केली आहे.
इगतपुरी तालुक्यातील धामणगावजवळ सर्वात मोठे वैद्यकीय महाविद्यालय गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहे. याठिकाणी विविध शाखांचे डॉक्टर प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात तर कमी पैशात काही मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याने येथे दररोज विविध आजारांचे शेकडो रुग्ण जात असतात. या ठिकाणी भगूर, देवळाली कॅम्प परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक जातात त्यामुळे सध्या भगूर बसस्थानकातून रुग्णालयात जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी होत असते. परंतु येथे जाण्यासाठी ग्रामीण एसटी बस डेपोची इगतपुरीपर्यंत एक आणि घोटीमार्गे धामणगाव तर हरसाळे, वंजारवाडी अशी एक बस जाते.
प्रवाशांची संख्या विचारात घेता, सुरक्षित प्रवास करण्यासाठी भगूर बसस्थानकातून सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन दोन तासांच्या अंतराने सिटी बस चालू करावी, अशी मागणी भाजप उपाध्यक्ष संजय बलकवडे, नीलेश हासे, प्रताप गायकवाड, अण्णाजी कापसे, शशिकांत घुगे, कार्तिक बलकवडे, संजय कडभाने, श्याम भागवत, विलास कुलकर्णी यांनी केली आहे.
प्रवाशांची गैरसोय
बसची संख्या कमी असल्याकारणाने प्रवाशांना तासन् तास बसची वाट पहात ताटकळावे लागते. परिणामी त्यांना टॅक्सी, रिक्षा वा मिळेल त्या वाहनाने जादा पैसे मोजावे लागतात. त्यासाठी क्षमतेपेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याने भगूर ते एसएमबीटी मार्गावर दररोज हजारो प्रवासी जीवघेणे प्रवास करतात.