एस.टी. महामंडळाची वारी हुकल्याने सलग दुसऱ्या वर्षी दीड कोटींचा फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:43+5:302021-07-22T04:10:43+5:30
नाशिक: यात्रा, जत्राच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाला मोठे उत्पन्न मिळत असते. धार्मिक सण, उत्सवाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी ...

एस.टी. महामंडळाची वारी हुकल्याने सलग दुसऱ्या वर्षी दीड कोटींचा फटका!
नाशिक: यात्रा, जत्राच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाला मोठे उत्पन्न मिळत असते. धार्मिक सण, उत्सवाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी जादा गाड्यांचेदेखील नियोजन केले जाते; मात्र या दोन वर्षांच्या काळात धार्मिक स्थळांवर तसेच यात्रा, जत्रांवर निर्बंध असल्याचा फटका एस.टी. महामंडळालादेखील बसला आहे. पंढरपूरच्या यात्रेसाठी नाशिक विभागाला दरवर्षी दीड कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळते; मात्र सलग दुसऱ्या वर्षी महामंडळाला या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.
सन २०१९ मधील पंढरपूर यात्रेची आकडेवारी पाहिली तर त्यावरून महामंडळाला गेल्या दोन वर्षात माेठा आर्थिक फटका बसल्याचे दिसून येते.
२०१९ मध्ये नाशिकच्या एस.टी.महामंडळाला दीड कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले हेाते. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा लाख रुपये अधिक उत्पन्न मिळाले होते. जिल्ह्यातील १३ डेपोंमधून सुमारे २९५ बसेस सोडण्यात आल्या होत्या.
३०० : बसेस दरवर्षी पंढरपूरसाठी सोडल्या जायच्या
१ कोटी ६० लाख रुपये उत्पन्न मिळायचे एस.टीला
३६०००: प्रवासी एस.टीतून दरवर्षी प्रवास करायचे
--इन्फो--
संतश्री निवृत्तीनाथ पालखीसाठी दोन बसेस
शासनाच्या आदेशाप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या पालखीसाठी दोन बसेस पुरविण्यात आलेल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार या बसेस विनामूल्य देण्यात आल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठीदेखील या बसेस उपलब्ध राहणार आहेत.
--इन्फो--
नाशिक जिल्ह्यातून संतश्री निवृृत्तीनाथ पालखी
राज्यातील दहा मानाच्या पालख्यांमध्ये त्र्यंबकेश्वर येथून निघणारी संतश्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा समावेश आहे. कोरेानामुळे यंदा बसमधून पालखी वाखरीपर्यंत रवाना झाली असली तरी यापूर्वी या दिंडीत जिल्ह्यातील सुमारे ३०० ते ३५० दिंड्या सहभागी होत असतात. पालखी निघण्यापूर्वी जिल्हाभरातून वारकऱ्यांच्या दिंड्यांचे त्र्यंंबकेश्वरला आगमन होत असते. ----इन्फो--
वारकऱ्यांचे गावी मन रमेना!
१) दरवर्षी पंढरपूरची वारी करीत आहे; मात्र सलग दुसऱ्या वर्षी वारीला जाता आले नाही, याची खंत लागून राहिली आहे. टाळ-मृदंगाचा ध्वनी आणि विठ्ठल नामाचा गजर कानी सतत गुंजत आहे. - वारकरी.
२) यंदा माउलीचे दर्शन होणार नसल्याची हुरहुर लागली आहे. एस.टीतून निवृत्तीनाथांची पालखी जाणार असल्याने या पालखी सोहळ्यात सहभागी होता आले नसल्याने मनाला हुरहुर लागून राहिली आहे. - वारकरी.