नाशिक : गाव तेथे एसटी अन् सगळीकडे आमचे नेटवर्क असे ब्रीद मिरविणाऱ्या महामंडळ अन् टपाल खात्याला वडाळागाव परिसराचे वावडे असल्याचे दिसते. एक तप होऊनदेखील बंद पडलेली एसटी सुरू होऊ शकली नाही आणि वडाळा शिवारासाठी कायमस्वरुपी नियमित पोस्टमनदेखील उपलब्ध होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे हे गाव महापालिकेच्या हद्दीतीलच आहे.महापालिकेच्या पुर्व प्रभागामधील प्रभाग क्रमांक ३०मध्ये समाविष्ट असणा-या वडाळागावाला वर्षानुवर्षांपासून मुलभूत सोयीसुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून शहर बससेवेतून वडाळ्याला मागील बारा वर्षांपुर्वी वगळले गेले ते आजतागायत. महापालिकेकडून शहर बससेवेची ‘डबल बेल’ वाजविण्याची तयारी सुरू झाल्यामुळे वडाळागावात बस धावू शकेल, अशी आशा वडाळावासीयांकडून व्यक्त केली जात असतानाच आता वडाळागावात येणारा पोस्टमनदेखील मागील महिनाभरापासून हद्दपार झाला आहे. टपाल खात्याकडून वडाळागाव शिवारात टपालाचा बटवडा करण्यासाठी ग्रामीण डाकसेवकांची मदत घेतली जात होती. ग्रामीण डाकसेवक (पोस्टमन) संपुर्ण वडाळाशिवारासह इंदिरानगर भागात टपालाचा बटवडा करत होते. अशोकामार्गावरील कल्पतरुनगरपासून तर थेट संपुर्ण खोडेनगर, विधातेनगर, कुर्डूकरनगर, वडाळागाव, रविशंकर मार्ग परिसर सादिकननगर, अण्णाभाऊ साठेनगर, इंदिरानगर, विनयनगर, दिपालीनगर, शिवाजीनगर, भारतनगर, रजा कॉलनी अशा सर्व परिसरातील नागरिकांच्या बटवड्याचा भार केवळ एका पोस्टमनवर टपाल खात्याने सोपविला होता. त्यामुळे हा भार पोस्टमनला पेलविला गेला नाही.