नाशिक : दारणा नदीच्या खोऱ्यात धुमाकूळ घालणा-या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने लावली ताकद पणाला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांचा चमुदेखील नाशिक पश्चिम वनविभागाच्या रेस्क्यू टीमच्या मदतीला शहरात बुधवारी (दि.१७) दाखल झाला. या संपुर्ण भागात एकूण ८ पिंजरे तैनात करण्यात आले आहे.भगुर गावाजवळील दोनवाडे गावापासून ते थेट बाबळेश्वरपर्यंत गावकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. एकापाठोपाठ या भागातील विविध गावांमध्ये मनुष्यावर बिबट हल्ले होऊ लागल्याने घबराट पसरली. बिबट्याच्या हल्ल्यात एप्रिलपासून आतापर्यंत एका चिमुकलीसह दोन मुले व एका वृध्दाचा बळी गेला आहे. तसेच दैव बलवत्तर म्हणून १० जून रोजी शेवगेदारणा शिवारात समृध्दी कासार या तीन वर्षाच्या चिमुकलीचे प्राण वाचले. बिबट्याने तिलाही पंजा मारून जखमी केले; मात्र जवळच असलेली तीची आजी गजराबाई या सावध असल्यामुळे त्यांनी बिबट हल्ला मोठ्या धाडसाने परतवून लावण्यास यश मिळविले आणि आपल्या नातीला वाचविले. घराच्या अंगणात खेळत असलेल्या गुंजन नेहेरे या बालिकेला बिबट्याने मंगळवारी (दि.१६) रात्री आठ वाजेच्या सुमारास झडप घालून ऊसशेतीत नेऊन ठार केल्याची घटना घडल्याने परिसरात अधिकच संताप व्यक्त होऊ लागला.