अवकाळी सरींचा शिडकावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:59+5:302021-05-10T04:14:59+5:30
---- नाशिक : शहर परिसरामध्ये रविवारी (दि.९) दुपारनंतर अचानकपणे ढगाळ वातावरण तयार झाले आणि काही वेळ सोसाट्याचा वादळी वारा ...

अवकाळी सरींचा शिडकावा
----
नाशिक : शहर परिसरामध्ये रविवारी (दि.९) दुपारनंतर अचानकपणे ढगाळ वातावरण तयार झाले आणि काही वेळ सोसाट्याचा वादळी वारा सुटला. काही वेळेतच शहराच्या मध्यवर्ती भागासह काही उपनगरीय भागात अवकाळी हलक्या सरींचा रिमझिम वर्षाव झाला. कमाल तापमानाचा ३७.५अंश इतके नोंदविले गेले.
शहरातील म्हसरुळ, जुने नाशिक, द्वारका, काठेगल्ली, वडाळा गाव, इंदिरानगर अशोकामार्ग या उपनगरीय भागांमध्ये हलकासा शिडकावा झाला. सकाळपासून उन्हाची प्रखरपणे तीव्रता जाणवत होती. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मागील चार ते पाच दिवसांपासून दररोज दुपारनंतर शहराचे हवामान बदलत आहे. दुपारनंतर काही उपनगरांमध्ये ढग आले. तसेच हलक्या सरींचा वर्षावदेखील झाला. काही भागात मात्र केवळ ढगाळ हवामान राहिले, यामुळे उकाडा अधिकच वाढला.
दुपारी ४ वाजेपासून शहर व उपनगरीय भागातील हवामान बदलण्यास सुरुवात झाली होती. पावसाचे वातावरण तयार होऊन ढग दाटून आले. काही भागात वादळी वाऱ्यासह टपोऱ्या थेंबांच्या सरींनी ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावली. कमाल तापमान शनिवारी ३८.९अंशावर पोहचले होते. तसेच किमान तापमानही २४ अंशाच्या जवळपास स्थिरावत आहे.