बाजार समितीसाठी उत्स्फूर्त मतदान
By Admin | Updated: July 27, 2015 00:09 IST2015-07-26T23:42:54+5:302015-07-27T00:09:03+5:30
बाजार समितीसाठी उत्स्फूर्त मतदान

बाजार समितीसाठी उत्स्फूर्त मतदान
नाशिक : जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या व शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी रविवारी उत्स्फूर्त मतदान झाले. दरम्यान, जिल्ह्याच्या सर्वच ठिकाणी ९० टक्क्यांच्या वर शांततेत मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सोमवारी मतमोजणी होणार आहे.
नाशिक बाजार समितीसाठी
९४, कळवणला ९८.२१, चांदवडला ९९ येवल्याला ९८.६५, नांदगावला ९७.७५ तर सिन्नरला ९६ टक्के मतदान झाले. बहुतांश बाजार समित्यांमध्ये आजी-माजी आमदारांमध्ये तसेच आजी-माजी जिल्हा बॅँक संचालकांमध्ये या बाजार समित्यांच्या निमित्ताने द्वंद रंगले. नाशिक बाजार समितीसाठी माजी खासदार व बाजार समितीचे मावळते अध्यक्ष देवीदास पिंगळे यांच्या आपलं पॅनल विरोधात माजीमंत्री बबनराव घोलप यांच्या शेतकरी विकास पॅनलचे आव्हान आहे. नगरसेवक दिनकर पाटील यांचेही परिवर्तन पॅनल बाजार समितीच्या आखाड्यात उतरले. कळवणला जिल्हा बॅँक संचालक धनंजय पवार यांच्या विरोधात आमदार जे.पी. गावित व भाजपा जिल्हाप्रमुख विकास देशमुख रिंगणात होते. चांदवड बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व उत्तम बाबा भालेराव यांच्या पॅनल विरोधात आमदार डॉ.राहुल अहेर व डॉ.आत्माराम कुंभार्डे यांच्यात सरळ सामना रंगला.
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या आखाड्यात माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासमोर आमदार राजाभाऊ वाजे यांच्यात सामना झाला. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बापूसाहेब कवडे व जिल्हा बॅँक उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्या पॅनल विरोधात माजी आमदार अॅड. अनिलकुमार अहेर व आमदार पंकज भुजबळ यांचे पॅनल समोरासमोर उभे ठाकले होते. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या पॅनलसमोर शिवसेनेचे संभाजी पवार व राष्ट्रवादीचेच नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांच्यात सरळ लढत झाली.