विशेष पोलीस महानिरीक्षकांची मालेगावी भेट
By Admin | Updated: April 7, 2016 23:56 IST2016-04-07T22:47:59+5:302016-04-07T23:56:11+5:30
विनय चौबे : कायदा, सुव्यवस्थेसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा

विशेष पोलीस महानिरीक्षकांची मालेगावी भेट
आझादनगर : मालेगाव शहरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यात जनतेचा सहभाग अत्यावश्यक असून, अनेक कटु प्रसंगातही शहर पोलीस दल व जनता यांच्यातील समन्वयातूनच अनेक वर्षांपासून शहरात शांतता नांदत आहे. म्हणून येथील नागरिकांचे योगदान कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी काढले.
आज दुपारी १२ वाजेदरम्यान त्यांनी मालेगावी भेट दिली. अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात शहरातील सर्व क्षेत्रातील नागरिकांशी चर्चा केली. ते म्हणाले, जेथे नागरिक तेथे समस्या राहणारच; परंतु मालेगाव पोलीस दलातर्फे सर्वच विभागाच्या समस्या सोडविण्यात येतात. म्हणूनच येथे रस्त्यावरील अतिक्रमण असो की सायजिंगचे प्रदूषण सर्व तक्रारी पोलिसांकडे येतात. यातून शहरवासीयांचा पोलिसांवरील असलेला विश्वास सिद्ध होतो. परंतु एखादा शुल्लक मुद्दा संपूर्ण शहरावर लादला असता त्यावर चर्चेतून तोडगा काढावा असा सल्लाही काही तक्रार करणाऱ्यांना दिला. यावेळी शहराच्या सद्यस्थितीची माहिती उपस्थितांकडून जाणून घेतली. तेव्हा लोकायुक्तांकडून आलेल्या आदेशान्वये करण्यात आलेल्या कारवाई, सायजिंगद्वारे होणारे प्रदूषण, वाहतूक कोंडी, गुन्हेगारी याबाबत तक्रार करण्यात आली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उपअधीक्षक गजानन राजमाने, माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल, बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे, नगरसेवक संजय दुसाने, सुफी गुलाब रसूल, युसुफ इलियास, केवळ हिरे, पप्पू पाटील, हबीबमियाजी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)