जिल्ह्यातील पेरण्या ६० टक्क्यावर थांबल्या !
By श्याम बागुल | Updated: July 18, 2019 18:57 IST2019-07-18T18:55:11+5:302019-07-18T18:57:12+5:30
यंदा मान्सूनचे आगमन उशिरा परंतु समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा खरीपाची पेरणी करण्याची मनोमन तयारी केली होती. परंतु पावसाचे आगमन खुपच लांबणीवर पडले.

जिल्ह्यातील पेरण्या ६० टक्क्यावर थांबल्या !
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : जुनच्या अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात जोरदार आगमन झालेल्या मान्सुनच्या भरवशावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांपुढे पावसाच्या दडीमुळे नवीन संकट उभे राहिले असून, याच पावसाचा आधार घेवून गेल्या आठवड्यापर्यंत जोमात असलेल्या खरीपाच्या पेरण्यांना ब्रेक लागला आहे. जिल्ह्यात जुलैच्या दुस-या आठवड्यापर्यंत जेमतेम ६० टक्केच पेरण्या होवू शकल्या आहेत. येत्या आठ दिवसात पावसाचे आगमन न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदा मान्सूनचे आगमन उशिरा परंतु समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा खरीपाची पेरणी करण्याची मनोमन तयारी केली होती. परंतु पावसाचे आगमन खुपच लांबणीवर पडले. त्यातही मान्सुनचे आगमन झाल्यावर पाहिजे त्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली नाही. मात्र आता पावसाचे आगमन झाल्याचे पाहून शोतक-यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून खरीपाच्या पेरण्यांना सुरूवात केली. अशातच ७ ते ९ जुलै दरम्यान पावसाने झोडपून काढल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या. पाऊस थांबताच पेरण्यांनी वेग घेतला. गेल्या आठवड्यापर्यंत ५३ टक्के पेरण्या झाल्या असताना अचानक पावसाने दडी मारल्यामुळे एका आठवड्यात जेमतेत सात टक्केच पेरण्या होवू शकल्या आहेत. मुळात एखाद दुस-या पावसाच्या भरवशावर जमिनीची पुरेशी ओल झालेली नसताना शेतक-यांनी पेरणी केल्यामुळे आता नेमके मोड येण्याच्या स्थितीतच पिकाला पाणी नसल्यामुळे त्याने तग धरण्यापुर्वीच माना टाकायला सुरूवात केली आहे. कृषी जाणकारांच्या मते शेतात किमान नऊ इंच जमीन ओली असताना केलेल्या पेरणीला पाऊस लांबल्याची फारशी भिती नाही. मात्र सध्याच्या पेरण्या ह्या निव्वळ तीन इंच जमीन ओली असल्याच्या भरवशावर करण्यात आल्यामुळे पिकांना सद्यस्थितीत पावसाची प्रचंड गरज आहे. मात्र पाऊस पडण्याऐवजी उन्हाळ्यासारखी उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे आणखी आठ दिवस पाऊस न झाल्यास पिकांची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, त्यानंतर मात्र शेतक-यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.