टमाट्याच्या भावात काहीशी सुधारणा
By Admin | Updated: December 1, 2014 01:19 IST2014-12-01T01:18:42+5:302014-12-01T01:19:10+5:30
टमाट्याच्या भावात काहीशी सुधारणा

टमाट्याच्या भावात काहीशी सुधारणा
वणी : टमाट्याच्या कोसळलेल्या दरात बहुतांशी सुधारणा झाली आहे. वणी उपबाजारात दहा रुपये किलो टमाटा प्रतवारी व दर्जा पाहून खरेदी-विक्री केला जात असल्याने उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मागील आठवड्यात टमाट्याचे दर घसरल्याने उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र सध्या आंध्र, ओरिसा, पंजाब, गुजरात या राज्यांमध्ये टमाट्याची मागणी वाढल्याने वीस किलोच्या क्रेटला एकशे पन्नास ते दोनशे रुपयांचा दर मिळत आहे. त्यात दोन ते तीन दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढल्याने टमाटा पिकण्यासाठी अधिक कालावधी लागतो. त्यामुळे उत्पादनावर याचा प्रतिकूल परिणाम होऊन उत्पादनात तुलनात्मकरित्या घट येत असल्याने उपबाजारात टमाट्याची आवक कमी झाल्याने भावात सुधारणा झाल्याची माहिती निर्यातदार टमाटा व्यापारी संजय उंबरे यांनी दिली.
दरम्यान, टमाट्याचा हंगाम संपेपर्यंत टमाट्याचे दर स्थिर राहणार असल्याच्या सद्यस्थितीतील अंदाज वर्तविण्यात आल्याने उत्पादकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)