सौर पंप दोन वर्षापासून मंजूर;‌ पण सुरू कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:17 IST2021-01-01T21:15:08+5:302021-01-02T00:17:11+5:30

निकवेल : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथील वागदर वस्तीत २ वर्षांपूर्वी ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत सौर पंप मंजूर झाला होता. जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांच्या हस्ते उद्घाटनही झाले. उद्घाटन झाल्यानंतर चार ते पाच महिन्यात फक्त तेथे बोअर करण्यात आला. बोअर केल्यावर तेथे चांगले पाणीही लागले. त्या दोन वर्षांपासून तो बोर तसाच प्लास्टिक पिशवीने झाकलेला आहे. नंतर त्या बोअरकडे फिरकूनही पाहिले नाही. परिसरातील रहिवासी तो सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Solar pump approved for two years; but when will it start? | सौर पंप दोन वर्षापासून मंजूर;‌ पण सुरू कधी होणार?

सौर पंप दोन वर्षापासून मंजूर;‌ पण सुरू कधी होणार?

ठळक मुद्देकिकवारी बुद्रुकच्या ग्रामस्थांना प्रतीक्षा

आदिवासी वस्तीत नागरिकांना पाणी पुरवठ्यासाठी एकाच हातपंपाची सोय आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो. किकवारी बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येथील वागदर वस्तीत आदिवासी कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही सर्व कुटुंबे मोलमजुरीने उदरनिर्वाह करतात. मजुरीवर असल्याने दिवसभर काम करून सायंकाळी पाण्यासाठी धावपळ करावी लागते. नाहीतर आपली मजुरी बुडवून कुटुंबातील किमान एका सदस्याला घरातील पाणी भरण्यासाठी घरी राहावे लागते. वागदर वस्तीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी आहे. शाळा सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांना हात पंपाचा पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागतो. पाण्याची तेथे कोणतीही सोय नाही; मात्र सौर पंप मंजूर असूनही वस्तीतील लोकांना हात पंपावरील पाण्याचा वापर करावा लागतो.
जिल्हा परिषद सदस्य यांना वेळोवेळी संपर्क केआ असता ठेकेदार पुढच्या आठवड्यात काम चालू करत आहे, असे प्रत्येक वेळेस सांगतात; पण तो पुढचा आठवडा कधी दोन वर्षांपासून उगवला नाही. तरी जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांनी ठेकेदाराला सांगून वागदर वस्तीवरील सौर पंपाचे काम लवकरात लवकर करून तेथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी वागदर वस्तीवरील ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Solar pump approved for two years; but when will it start?