सौर कृषि वाहिनी योजनेतून सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:10 IST2021-06-23T04:10:51+5:302021-06-23T04:10:51+5:30
सटाणा (नितीन बोरसे) : राज्य शासनाच्या सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी विकेंद्रित सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांची उभारणी करण्यात ...

सौर कृषि वाहिनी योजनेतून सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प
सटाणा (नितीन बोरसे) : राज्य शासनाच्या सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी विकेंद्रित सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पांसाठी महावितरणकडून ३ ते ५० एकरपर्यंत जागा भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहे. त्या माध्यमातून पडिक किंवा नापीक जमिनीतून वीज प्रकल्प उभारणीची संधी तर मिळणारच, परंतु ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात भाडेदेखील मिळणार असून त्यामुळे गाव विकासाला चालना मिळणार आहे.
जमीन देणाऱ्यांना एकरी तीस हजार रुपये भाडे मिळणार असून, त्यात दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसह खासगी जमीनधारक, समूह तसेच सहकारी संस्था, साखर कारखाने, ग्रामपंचायत, ग्रामपालिका, निमशासकीय संस्था आदींनाही त्यात सहभागी होता येणार आहे. ऊर्जा विभागाच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सध्या वेगवेगळ्या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारणीला वेग देण्यात येत आहे. या प्रकल्पांसाठी शेतकरी आणि महसूल विभागाच्या मालकीची किंवा ताब्यातील जमीन वगळून इतर संस्था आणि गटांच्या जमिनी २७ ते ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.
सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी भाडेपट्टीवरील जमीन ही निजोखमी, अतिक्रमणमुक्त, तारणमुक्त, कर्जमुक्त तसेच कोणत्याही संस्थेची बोजामुक्त असणे आवश्यक आहे. जमीन मालकांची संख्या एकापेक्षा अधिक असल्यास त्यांच्यापैकी एका व्यक्तीस नामनिर्देशित करून अधिकारपत्र द्यावे लागेल. अर्जदार किंवा अधिकारप्राप्त प्रतिनिधीने दोन महिन्यांच्या आतील अद्ययावत सातबारा, आठ अ आणि फेरफार उताऱ्याच्या मूळ प्रती अर्ज दाखल करताना अपलोड करणे आवश्यक आहे. अर्जदाराने दहा हजार रुपये अधिक अठरा टक्के जीएसटी प्रक्रिया शुल्क भरणेही आवश्यक आहे, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
------------------
सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी महावितरणच्या ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राच्या पाच किलोमीटर परिघातील जमिनी भाडेतत्त्वावर घेण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. सोबतच महसूल विभागाच्या मालकीच्या आणि ताब्यातील जागा नाममात्र एक रुपया भाडेतत्त्वावर ३० वर्षांसाठी अधिग्रहित करण्यात येणार आहे. बागलाण तालुक्यात शेतीसाठी हा प्रकल्प प्राधान्याने उभारण्यासाठी प्रयत्न केला जाणार असून, कमीत कमी ३० एकर जमीन असलेल्या ग्रामपंचायतींचा सर्व्हे केला जात आहे. लवकरच ज्या ग्रामपंचायती मागणी अर्ज करतील त्यांना प्राधान्य क्रम देण्यात येईल.
- सुनील बोंडे, कार्यकारी अभियंता, सटाणा
--------------------
विजेची समस्या दूर करण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी विकेंद्रित सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांची जास्तीत जास्त उभारणी करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेल्या बरड जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून लवकरच वीज उपकेंद्रच्या पाच किमी परिघातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जागृती केली जाईल.
- दिलीप बोरसे, आमदार, बागलाण