उड्डाणपुलांचे मृद परीक्षण तूर्तास थांबवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST2021-07-26T04:13:10+5:302021-07-26T04:13:10+5:30

नाशिक महापालिकेच्या राजकारणात दोन्ही पूल अत्यंत गाजले असून, त्यामुळे तांत्रिक कारणांमुळे काम स्थ‌गित केले असले तरी तो चर्चेचा विषय ...

Soil testing of flyovers stopped immediately! | उड्डाणपुलांचे मृद परीक्षण तूर्तास थांबवले!

उड्डाणपुलांचे मृद परीक्षण तूर्तास थांबवले!

नाशिक महापालिकेच्या राजकारणात दोन्ही पूल अत्यंत गाजले असून, त्यामुळे तांत्रिक कारणांमुळे काम स्थ‌गित केले असले तरी तो चर्चेचा विषय ठरला आहे.

सुमारे अडीचशे कोटी रुपयांचे हे दाेन पूल असून, मायको सर्कल ते शासनाचे बांधकाम भवन आणि त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉल अशा दोन ठिकाणी हे पूल साकारण्यात येणार आहेत. सुरुवातीला पूल बांधण्यास आणि त्यासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यास सत्तारूढ भाजपने पुढाकार घेतला, मात्र नंतर महापालिका आयुक्तांनी तीनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास नकार दिल्यानंतर भाजपने तूर्तास या पुलांचे बांधकाम स्थगित करण्याची मागणी केली होती. महापालिकेने ठेकेदारांना वर्कऑर्डर दिल्यानंतरही हा वाद वाढला होता. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि महापौर सतीश कुलकर्णी यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर भाजपचे सभागृहनेते कमलेश बोडके यांनीदेखील त्यात उडी घेतली होती. दरम्यान, आता वाद शमला असून, भाजपने मूकसंमती दिल्याने पुलाच्या कामाला सुरुवात झाली.

अर्थात, प्राथमिक स्तरावर केवळ मृद परीक्षण सुरू करण्यात आले आहे. दोन्ही नियोजित पुलांचे पिलर्स उभारण्यासाठी हे परीक्षण सुरू असतानाच महापालिकेच्या बांधकाम विभागाने काम थांबवले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वादातून कामे थांबल्याची चर्चा सुरू झाली. शहर अभियंता संजय घुगे यांनी त्याचा इन्कार केला असून, तांत्रिक पूर्ततेमुळे काम काही दिवस थांबवले आहे. डिझाइननुसार जागेवर काम करण्यासाठी काम थांबवल्याचे घुगे यांनी सांगितले.

कोट...

नियोजित पुलांच्या बांधकामाआधी डिझाइन तयार केले जाते आणि त्यानंतरच इस्टिमेट तयार करून निविदा मागवण्यात आल्या आहेत. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी पिलर्ससाठी माती परीक्षण करताना डिझाइननुसार लाइन मेजरमेंट करण्यासाठी हे काम दोन-चार दिवसांसाठी थांबवले. ही तांत्रिक बाब असून, नंतर लगेचच ते सुरू होईल.

- संजय घुगे, शहर अभियंता, महापालिका

Web Title: Soil testing of flyovers stopped immediately!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.