समाजवादी नेते निहाल अहमद निवर्तले

By Admin | Published: March 1, 2016 12:12 AM2016-03-01T00:12:48+5:302016-03-01T00:12:48+5:30

चळवळीतील झुंझार ‘साथी’ हरपला : शासकीय मानवंदना देऊन दफनविधी

Socialist leader Nihal Ahmad passed away | समाजवादी नेते निहाल अहमद निवर्तले

समाजवादी नेते निहाल अहमद निवर्तले

googlenewsNext

मालेगाव : येथील ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी मंत्री साथी निहाल अहमद मौलवी मोहंमद उस्मान (९०) यांचे सोमवारी (दि.२९) सकाळी पावणेसात वाजता नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. रात्री उशिरा बडा कब्रस्थान येथे शासकीय मानवंदना देऊन त्यांचा दफनविधी करण्यात आला.
काही महिन्यापासून निहाल अहमद यांची प्रकृती खालावली होेती. रविवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ते उपचारास प्रतिसाद देत नसल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शहरावर शोककळा पसरली. कार्यकर्त्यांनी त्यांच्या हजारखोली येथील निवासस्थानी धाव घेतली.
खासदार सुभाष भामरे, राज्यमंत्री दादा भुसे, रोहिदास पाटील, आमदार पंकज भुजबळ, कपिल पाटील, आसीफ शेख रशीद, माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल, उपमहापौर युनूस इसा, शमशेरखान पठाण, गुलाबराव पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. निहाल अहमद यांचे पार्थिव दुपारी समाजवादी नेते निहाल अहमद निवर्तले
चळवळीतील झुंझार ‘साथी’ हरपला : शासकीय मानवंदना देऊन दफनविधीपावणेतीन वाजता त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या निधनामुळे शहरातील सर्व व्यवहार बंद होते. रात्री
९ वाजता त्यांचे जनाजा (अंत्ययात्रा) काढण्यात आला. शासकीय मानवंदना देत बडा कब्रस्तान येथे दफनविधी पार पडला.
निहाल अहमद यांनी १९६७ मध्ये प्रजा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवून विजयश्री संपादन केली होती. त्यानंतर १९७२चा अपवादवगळता १९७८ ते १९९५ पर्यंत त्यांनी आमदारकी भूषविली होती. राज्यातील पुलोदच्या सरकारमध्ये त्यांनी तंत्र व उच्चशिक्षण तथा रोजगार हमी योजना मंत्री म्हणून कामकाज पाहिले होते. १९८६ ते ९० दरम्यान विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी भूमिका बजावली. मालेगाव महापालिका अस्तित्वात आल्यानंतर २००२ मध्ये प्रथम महापौर होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. राजकीय जीवनातील वादळी तसेच अनोखे निर्णय घेणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. चळवळीतील झुंझार नेता, उत्कृष्ट वक्ता, तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती. गोरगरीब, शोषित, दलित, मुस्लीम व कामगारांच्या प्रश्नांसाठी ते आयुष्यभर झटत राहिले. केवळ आमदारकीच नव्हे; तर राज्यमंत्रीपदावर असतानाही त्यांनी कधी बडेजाव मिरविला नव्हता. नेहमी सायकलीवर फिरणारे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व जनसामान्यात ‘सायकलवाला आमदार’ म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, पाच मुले, तीन मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Socialist leader Nihal Ahmad passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.