समाजसेवींचा निर्मला पुरस्काराने सन्मान
By Admin | Updated: August 9, 2015 23:18 IST2015-08-09T23:16:50+5:302015-08-09T23:18:39+5:30
निर्मला लोककल्याण प्रबोधिनी : नि:स्वार्थ सेवाभाव जोपासण्याची प्रेरणा

समाजसेवींचा निर्मला पुरस्काराने सन्मान
नाशिक : नि:स्वार्थपणे सेवाभाव जोपासून समाजसेवेत अग्रेसर असणाऱ्या समाजसेवींना ‘निर्मला पुरस्कार-२०१५’ देऊन सन्मानित करण्यात आले.
समाजातील गोरगरीब आदिवासी जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या निर्मला लोककल्याण प्रबोधिनीच्या वतीने ‘निर्मला पुरस्कार-२०१५’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लायन्स क्लब सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक मुर्तडक, डॉ. मधुसुदन झवर, डॉ. शरद पाटील, सरोज दायमा, डॉ. प्रशांत बिर्ला, डॉ. आसिफ तांबोळी आदि मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर देवरे यांनी केले.
समाजातील गरजूंची सेवा करण्यासाठी पैशाची श्रीमंती नव्हे तर मनाची श्रीमंती आवश्यक असते. सामाजिक बांधीलकीची जोपासना करत समाजाचे ऋण फेडण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे यावेळी
अशोक मुर्तडक यांनी मनोगत व्यक्त करताना
सांगितले. १९९१ सालापासून संस्था कार्यरत असून, वैद्यकीय सेवेबरोबरच आरोग्यविषयक जनजागृती करण्यावर संस्थेने भर दिला आहे. याअंतर्गत संस्थेने विविध उपक्रम
राबविले असल्याची माहिती झवर यांनी यावेळी दिली.
यावेळी डॉ. भानुदास डेरे (ग्रामीण शिक्षण व प्रबोधन), डॉ. विजय बिडकर (आरोग्य सेवा आदिवासी क्षेत्र), डॉ. आरती काबरा (आरोग्यसेवा), बाळकृष्ण पागेरे (शिक्षणसेवा), सुमती नावरेकर (कुष्ठरोग सेवा) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मापत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक देवरे यांनी केले व जयंत ठोमरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)