सोशल नेटवर्किंग फोरमचा ‘असाही’ मदतीचा हात
By Admin | Updated: August 2, 2015 23:39 IST2015-08-02T23:38:21+5:302015-08-02T23:39:48+5:30
लाडचीला उपक्रम : विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी

सोशल नेटवर्किंग फोरमचा ‘असाही’ मदतीचा हात
नाशिक : रक्तगटासह विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याचा फतवा महाराष्ट्र शासनाने काढला खरा; परंतु आदिवासी-दुर्गम भागात रक्तगट तपासणीसाठी ना प्रयोगशाळा ना डॉक्टर्स उपलब्ध. जिल्ह्यातील लाडची या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला रक्तगट तपासणीचा प्रश्न भेडसावत असतानाच सोशल नेटवर्किंग फोरमने त्यांना मदतीचा हात दिला आणि नाशिकहून खास डॉक्टरांचे पथक नेऊन सुमारे ४५० विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी अगदी मोफत करून दिली.
लाडची या गावच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी रक्त गटासह विद्यार्थ्यांची माहिती जमा करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाची माहिती सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांना दिली. परंतु गावात पॅथॅलॉजी लॅब उपलब्ध नसल्याने शाळेतील ४५० विद्यार्थ्यांना शहरात घेऊन जाणे अडचणीचे असल्याचे सांगण्यात आले. फोरमने त्यासाठी मदत करण्याची विनंतीही त्यांनी केली. सोशल फोरमचे वैद्यकीय विभागाचे सदस्य डॉ. पंकज भदाणे व डॉ. किशोर पाटील यांनी याकामी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार नाशिकपासून ३० कि.मी. अंतरावर असलेल्या लाडची गावात जाऊन ४५० विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासण्यात आले. त्यासाठी लागणारा सर्व खर्च सोशल नेटवर्किंग फोरमने केला. या उपक्रमासाठी गावच्या सरपंच विठाबाई पारधी, गटविकास अधिकारी रवींद्र परदेशी, गटशिक्षणाधिकारी अनिल शहरे, बीट विस्ताराधिकारी चित्रा देवरे, केंद्रप्रमुख शैला कुलकर्णी, मुख्याध्यापक विजयकुमार मोरे यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)