बोहरी बांधवांकडून सामाजिक बांधिलकी
By Admin | Updated: September 13, 2015 22:42 IST2015-09-13T22:41:57+5:302015-09-13T22:42:31+5:30
बोहरी बांधवांकडून सामाजिक बांधिलकी

बोहरी बांधवांकडून सामाजिक बांधिलकी
नाशिक : द्वारका येथील दाऊदी बोहरा समाजाच्या सामाजिक शाखेने कुंभमेळ्यासाठी आलेल्या भाविकांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. द्वारका येथे आलेल्या भाविकांचे स्वागत करून त्यांना चहा-पाणी देण्यात आला. पहिल्या पर्वणीच्या दिवशीदेखील बोहरी बांधवांच्या वतीने चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
दाऊदी बोहरा समाज शाखेच्या वतीने बारा वर्षांपूर्वी झालेल्या पर्वणीतही भाविकांची सेवा केली होती. पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार द्वारका, शंकरनगर येथून भाविक मार्ग असल्याने याच मार्गावर दाऊदी बोहरा समाज शाखेने भाविकांसाठी चहा, पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था केली होती. पहाटे पाच वाजेपासून भाविक रामकुंडाकडे रवाना होत असल्याने चहाची व्यवस्था करण्यात आली होती. बोहरा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केवळ चहा, पाणी देऊन आपले सामाजिक उत्तरदायित्व सांभाळले असे नाही, तर चहाचे कागदी ग्लास आणि कागदी प्लेट्स यांचा रस्त्यावर कचरा होऊ नये याचीदेखील काळजी घेतली होती. पहाटेपासून या सामाजिक सेवेत तरुण आणि ज्येष्ठ समाजबांधव सहभागी झाले होते. भाविकांसाठी दुपारनंतर नाश्त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. पुरीभाजीच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.
द्वारका परिसरात अनेक कक्ष
द्वारकामार्गे भाविक रामकुंडावर जात असल्याने या मार्गावर भाविकांच्या सेवेसाठी अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने चहा, पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांसाठी शुद्ध पाणी तसेच चहा आग्रहाने दिला जात होता. ज्या भाविकांना विश्रांतीची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी मंडप टाकून विश्रांतीची व्यवस्थाही स्वयंस्फूर्तीने करण्यात आली होती.