‘स्मार्ट नाशिक’ अॅपच्या ‘ओव्हर स्मार्ट’ करामती!
By Admin | Updated: May 3, 2017 01:04 IST2017-05-03T01:04:11+5:302017-05-03T01:04:25+5:30
महापालिकेची ‘अशीही’ जागरूकता : मीना माळोदे महापौर तर नयना घोलप उपमहापौर, सदस्यांच्या छायाचित्रांमध्ये घोळ

‘स्मार्ट नाशिक’ अॅपच्या ‘ओव्हर स्मार्ट’ करामती!
नाशिक : हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावण्याची प्रवृत्ती महापालिकेच्या प्रशासनातही भिनली असून, पावणेदोन वर्षांपूर्वी नाशिककरांसाठी खुल्या केलेल्या ‘स्मार्ट नाशिक’ अॅपच्या अद्ययावतीकरणाकडे साफ दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. महापालिकेच्या ‘जागरूक’ प्रशासनाने सन २०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची नावे अॅपवर लोड केली असली तरी पुरुषाच्या ठिकाणी स्त्री आणि स्त्रीच्या ठिकाणी महिला अशी छायाचित्रे टाकल्याने स्मार्ट अॅपच्या या ‘ओव्हर स्मार्ट’ करामती मनोरंजनाचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे महापौर रंजना भानसी यांच्याऐवजी माजी नगरसेवक मीना माळोदे यांचे तर उपमहापौर प्रथमेश गिते यांच्याऐवजी माजी महापौर नयना घोलप यांचे छायाचित्र टाकण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नाशिकचा प्रस्ताव पाठविण्यापूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट नाशिक’ ह्या मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली होती. या मोबाइल अॅपवर अन्य सर्व सुविधा उपलब्ध करून देतानाच पदाधिकारी व नगरसेवकांची माहिती व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकही देण्यात आले होते. दि. १५ सप्टेंबर २०१५ रोजी ‘स्मार्ट नाशिक’ अॅपसह स्मार्ट सिटी संकेतस्थळाचे लोकार्पण मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर अॅपच्या उपयुक्ततेबद्दल नेहमीच तक्रारी प्रशासनाकडे येत राहिल्या. मात्र, अॅपच्या अद्ययावतीकरणाकडे प्रशासनाकडून फारसे गांभीर्याने घेण्यात आले नाही. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक पार पडली. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांची नावे, त्यांचे पत्ते व भ्रमणध्वनी क्रमांक अॅपवर टाकण्यात आले आहेत. परंतु, नावे टाकताना छायाचित्रांमध्ये कमालीचा गोंधळ करून ठेवण्यात आला आहे.