‘स्मार्ट सिटी’चा मांडला यज्ञ; पदाधिकारी मात्र अनभिज्ञ
By Admin | Updated: July 23, 2015 00:13 IST2015-07-23T00:12:33+5:302015-07-23T00:13:30+5:30
नाराजीचा धूर : प्रशासनाकडून परस्पर बैठक

‘स्मार्ट सिटी’चा मांडला यज्ञ; पदाधिकारी मात्र अनभिज्ञ
नाशिक : ‘स्मार्ट सिटी’ची योजना नेमकी काय आहे, हे समजून सांगण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील विविध औद्योगिक-सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी निमंत्रित करत आयुक्तांच्या दालनात लोकसहभागाविषयी चर्चेचा यज्ञ मांडला; परंतु सदर बैठकीबाबत महापौर-उपमहापौरांसह पदाधिकाऱ्यांना अनभिज्ञ ठेवल्याने नाराजीचा धूर आता निघू लागला आहे. पदाधिकाऱ्यांच्या या नाराजीमुळेच प्रशासनाकडून पुन्हा एकदा पुढील आठवड्यात लोकसहभागाचे नाटक उभे केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्याला महासभेने मंजुरी दिल्यानंतर या योजनेत लोकसहभागही महत्त्वाचा असल्याने लोकांची मते जाणून घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी आयुक्तांच्या उपस्थितीत निमा, आयमा, के्रडाई, आयएमए, बार असोसिएशन, इंजिनिअरिंग क्लस्टर, नाईस, आर्किटेक्ट असोसिएशन, लघुउद्योग भारती, रिक्षा-टॅक्सी युनियन, नाशिक सिटिझन फोरम, बिल्डर्स असोसिएशन आदि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. आयुक्तांनीच बैठक बोलाविल्याने सर्व संघटनांचे पदाधिकारी झाडून हजर झाले; मात्र महापालिकेत आयुक्तांच्या दालनात गावपंगत होत असताना यजमानांना निमंत्रण नव्हते. त्यामुळे बैठकीला महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतीसह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती दिसली नाही. सदर बैठकीला पदाधिकाऱ्यांना डावलल्याने त्याचे पडसाद उमटले. पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत कानउघाडणीही केल्याचे समजते. सदर बैठक ही पूर्वतयारीसाठी असल्याची सारवासारव प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केली असली तरी पूर्वतयारीसाठी पदाधिकाऱ्यांची गरज का भासली नाही, असा सवाल पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पदाधिकाऱ्यांमध्ये उमटलेला नाराजीचा सूर पाहता प्रशासनाने पुढील आठवड्यात २८ जुलै रोजी सर्व पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांसाठी कार्यशाळा घेण्याचे निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)