क्षेत्रविकासातून साकारणार ‘स्मार्ट सिटी’
By Admin | Updated: October 23, 2015 22:23 IST2015-10-23T22:19:30+5:302015-10-23T22:23:32+5:30
महापालिकेतर्फे कार्यशाळा : लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या संकल्पनांची हवी जोड

क्षेत्रविकासातून साकारणार ‘स्मार्ट सिटी’
नाशिक : हरितक्षेत्र, पुनर्विकास आणि रेट्रोफिटिंग या क्षेत्रविकासाच्या तीन पर्यायांच्या माध्यमातून नाशिकला ‘स्मार्ट सिटी’ बनविण्याचे स्वप्न महापालिकेच्या वतीने लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना दाखविण्यात आले. स्वप्ननगरी प्रत्यक्षात आणण्यासाठी विविध उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याबरोबरच घरपट्टी-पाणीपट्टी करवाढीचेही संकेत प्रशासनाकडून यावेळी देण्यात आले. दरम्यान, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागातून ‘स्मार्ट सिटी’ घडविण्याचा निर्धार करण्यात आला.
केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानात पहिल्या टप्प्यात नाशिक शहराची निवड झालेली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात पात्र होण्यासाठी लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधींच्या संकल्पना-सहकार्यातून प्रस्ताव तयार केला जाणार असून, तो ३० नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे नगरसेवक आणि शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांसाठी महाकवी कालिदास कलामंदिरात दोन सत्रात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दोन्ही सत्रांत मार्गदर्शन करत नाशिक महापालिकेची सद्यस्थिती आणि भविष्यात राबवायच्या योजनांची माहिती दिली. गेडाम यांनी सांगितले, शहरांना स्वत:च्या पायावर उभे करणारे स्मार्ट सिटी अभियान आहे. या अभियानात वेगवेगळ्या संकल्पना ‘पीपीपी’च्या (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) माध्यमातून राबविण्यावर भर राहणार आहे. क्षेत्रविकासाच्या तीन पर्यायांतून स्मार्ट सिटी निर्माण करण्यात येईल. त्यासाठी विशिष्ट भाग निवडायचा असून, हरितक्षेत्र विकासासाठी सुमारे ५०० एकर जागा अपेक्षित आहे, तर पुनर्विकासासाठी २५० एकर आणि रेट्रोफिटिंगसाठी ५० एकर क्षेत्राची गरज भासणार आहे. सदर भाग निवडताना एकमत होणे आवश्यक आहे. त्यासाठी कुठून सुरुवात करायची याचा निर्णय महापालिकेच्या महासभेने घ्यायचा आहे. आहे त्या परिस्थितीत सुधारणा रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून करता येऊ शकेल.
उदासीन लोकप्रतिनिधी, जागरूक नागरिक
महापालिकेने ‘स्मार्ट सिटी’ संदर्भात दोन सत्रांत कार्यशाळा आयोजित केली होती. पहिले सत्र खास नगरसेवकांसाठी ठेवण्यात आले, तर दुसरे सत्र नागरिकांसह विविध संघटनांसाठी खुले होते. मात्र, नगरसेवकांसाठी ठेवण्यात आलेल्या सत्राला १२७ पैकी अवघ्या ३५ ते ४0 नगरसेवकांनीच हजेरी लावली. त्यातही प्रामुख्याने मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेस आणि अपक्ष नगरसेवकांचा सर्वाधिक सहभाग होता. केंद्र व राज्य सरकारमधील सत्ताधारी भाजपाच्या आमदार सीमा हिरे, गटनेते संभाजी मोरुस्कर, सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, कुणाल वाघ यांची उपस्थिती लाभली, परंतु दीपप्रज्वलन झाल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी सभागृह सोडले. शिवसेनेच्या नगरसेवकांचीही अनुपस्थिती दिसून आली. दुसर्या सत्राला मात्र कालिदास कलामंदिर नागरिकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले. त्यात तुलनेने कमी असलेल्या स्मार्ट नाशिककरांचीही संख्या चर्चेचा विषय ठरली.