झोपडपट्टी सर्वेक्षणातून आढळले ११० संशयित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:53 IST2020-06-10T22:22:03+5:302020-06-11T00:53:11+5:30
नाशिक : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर दाट वस्तीत एकही नागरिक लक्षण असताना घरी राहू नये आणि संसर्ग अधिक वाढू नये यासाठी महापालिकेने दाट वस्तीत विशेषत: झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षण केले असून, त्या माध्यमातून तब्बल ११० कोरोना संशयित रुग्णांना शोधण्यात यश आले आहे. शहरात बाधितांची संख्या वाढत असली तरी त्या मागे हेदेखील एक कारण आहे.

झोपडपट्टी सर्वेक्षणातून आढळले ११० संशयित रुग्ण
नाशिक : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर दाट वस्तीत एकही नागरिक लक्षण असताना घरी राहू नये आणि संसर्ग अधिक वाढू नये यासाठी महापालिकेने दाट वस्तीत विशेषत: झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षण केले असून, त्या माध्यमातून तब्बल ११० कोरोना संशयित रुग्णांना शोधण्यात यश आले आहे. शहरात बाधितांची संख्या वाढत असली तरी त्या मागे हेदेखील एक कारण आहे.
शहरात सुरुवातीला कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. परंतु ६ एप्रिल रोजी गोविंदनगर भागात पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर अन्य भागात रुग्ण आढळले, तरी दाट वस्त्यांमध्ये मात्र रुग्ण आढळला नव्हता. परंतु हळूहळू वडाळा, जुने नाशिक आणि पंचवटी भागात दाट वस्तीत रुग्णसंख्या वाढू लागताच प्रशासनाची चिंता वाढली. हा संसर्ग आणखी वाढू नये यासाठी महापालिकेने शहरातील दाट वस्त्यांत आरोग्य तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शहरातील सर्व १६९ झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण सुरू केले. गेल्या पंधरा दिवसांत महापालिकेच्या २०३ वैद्यकीय पथकांनी ६६ हजार ७९६ घरांमधील दोन लाख ७८ हजार ४२२ नागरिकांची तपासणी केली. यात कोरोनाची लक्षणे असणारे ११० संशयित आढळले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या तपासणी मोहिमेत वैद्यकीय विभागामार्फत अंगणवाडी, आशा कर्मचारीसुद्धा सहभागी झाल्या होत्या. त्यांनी केवळ कोरोनाचेच तर सारीचे रुग्णदेखील शोधले. सुदैवाने अद्याप सारीचा एकही रुग्ण आढळला नाही. या मोहिमेत ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, बालके यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.