नाशिकच्या किमान तपमानात हळूहळू वाढ; किमान तपमान ९.४ अंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:19 IST2018-01-01T19:18:18+5:302018-01-01T19:19:54+5:30
जोपर्यंत किमान तपमानाचा पारा दहा अंशांच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत मात्र बोच-या थंडीची तीव्रता नागरिकांना चांगलीच जाणवणार आहे.

नाशिकच्या किमान तपमानात हळूहळू वाढ; किमान तपमान ९.४ अंश
नाशिक : मागील आठवड्यापासून सातत्याने घसरणा-या शहराच्या किमान तपमानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसापासून तपमानाचा पारा दहा अंशाच्या दिशेने वर सरकत असल्याने थंडीची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोमवारी (दि.१) किमान तमपान ९.४ अंश इतके नोंदविले गेले.
डिसेंबरअखेर थंडीने नाशिककरांना तीव्र तडाखा दिला. कडाक्याच्या थंडीने नाशिककरांना हुडडुडी भरली होती. हंगामातील नीचांकी ७.६ अंश इतकी किमान तपमानाची नोंद २९ डिसेंबर रोजी हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली होती. एकूणच पारा पाच अंशाच्या जवळपास पोहचल्याने नाशिककर थंडीच्या तीव्रतेमुळे बेजार झाले होते. निफाडचे तपमानही ६ अंशावर घसरल्याने निफाडकरांनी धास्ती घेतली होती; मात्र किमान तपमानाचा पारा दोन दिवसापासून पुन्हा वर सरकत असल्याने काहीसा दिलासा नागरिकांना मिळत आहे. थंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार असल्याची आशा नागरिक व्यक्त करत आहे. जोपर्यंत किमान तपमानाचा पारा दहा अंशांच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत मात्र बोच-या थंडीची तीव्रता नागरिकांना चांगलीच जाणवणार आहे. रविवारी (दि.३१) पारा ९.२ अंशापर्यंत सरकला होता. सोमवारी पुन्हा दोन अंशांनी किमान तपमानात वाढ झाली. त्यामुळे लवकरच किमान तपमान दहा अंशांच्या पलीकडे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
निसर्ग लहरी असून, तो त्याचे रूप अचानकपणे बदलत असतो. त्याचा अनेकदा नागरिकांना प्रत्ययदेखील येतो आणि कधी कधी तर हवामान खात्याचे अंदाजही लहरी निसर्गापुढे फोल ठरतात. त्यामुळे हवामानाच्या स्थितीविषयी अंदाज बांधणेदेखील अवघड होते. मागील दोन ते तीन दिवसापासून किमान तपमानात हळूहळू वाढ होत आहे.