होतकरू साठ मुलींना मिळाले शैक्षणिक पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:19 IST2021-08-18T04:19:40+5:302021-08-18T04:19:40+5:30
मुलींना शिक्षण म्हणजे एक कुटूंबच शिक्षित करण्यासारखे असले तरी कोरोनामुळे गरीब कुटुंबातील आणि पालकांची आर्थिकस्थिती बिकट झालेली आहे. त्यातच ...

होतकरू साठ मुलींना मिळाले शैक्षणिक पालकत्व
मुलींना शिक्षण म्हणजे एक कुटूंबच शिक्षित करण्यासारखे असले तरी कोरोनामुळे गरीब कुटुंबातील आणि पालकांची आर्थिकस्थिती बिकट झालेली आहे. त्यातच मुलगी असल्यामुळे दुर्लक्षित केल्या गेलेल्या आपल्या विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. महापालिकेच्या शाळा क्रमांक १८ मधील शिक्षिका कुंदा बच्छाव व वैशाली भामरे यांना हा प्रकार आढळला. सुरुवातीला कुंदा बच्छाव शिंदे यांनी स्वतः तीन विद्यार्थिनी व त्यांचे पती किरण शिंदे यांनी एक विद्यार्थिनी शिक्षणासाठी दत्तक घेतली. श्रीमती वैशाली भामरे यांनी दोन विद्यार्थिनींना शिक्षणासाठी दत्तक घेतले; मात्र अन्य मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी शैक्षणिक पालकत्व.. एक हात मदतीचा! हे अभियान मनपा शिक्षक प्रशांत पाटील यांच्या सहकार्याने राबवले.
या निवडलेल्या विद्यार्थींना शैक्षणिक साहित्य प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. सोमेश्वरजवळील पाटील लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमास नाशिक मनपा शिक्षण समितीच्या शिक्षण सभापती संगीता गायकवाड, शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, सहायक धर्मादाय आयुक्त राम लिप्ते, गटनेते शिवसेना विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, नयनाताई गांगुर्डे, राधाताई बेंडकुळे, विजयकुमार इंगळे, केंद्रमुख्याध्यापक कैलास ठाकरे यांच्यासह अन्य पालक उपस्थित होते.
इन्फो...
शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी सोशल मीडियाचा वापर करत समाजातून या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्याला जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी पाच विद्यार्थिनी, पूजा राम लिप्ते यांनी पाच विद्यार्थिनी, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विलास शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांनी तसेच नगरसेविका नयना गांगुर्डे यांच्या पुढाकाराने इनरव्हील क्लब जेन नेक्स्ट, नाशिक यांनी वीस विद्यार्थ्यांची पुढील चार वर्षांसाठी शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.
छायाचित्र १४एनएमसी स्कूल...नावाने