मालेगावातील सहा हजार रिक्षाचालकांना मदतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 00:59 IST2021-05-04T23:42:48+5:302021-05-05T00:59:23+5:30
नाशिक : राज्य शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू करताना परवानाधारक रिक्षा चालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये मदत करण्याची घोषणा केली आहे. परंतु या घोषणेला आता महिना उलटत आला तरी मालेगाव शहरातील परवानाधारक सुमारे ६ हजार रिक्षा चालक अद्याप शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून मदत मिळेना आणि कोरोनाच्या निर्बंधांमुळे प्रवासी मिळेना, अशी अवस्था या रिक्षा चालकांची झाली आहे.

मालेगावातील सहा हजार रिक्षाचालकांना मदतीची प्रतीक्षा
नाशिक : राज्य शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू करताना परवानाधारक रिक्षा चालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये मदत करण्याची घोषणा केली आहे. परंतु या घोषणेला आता महिना उलटत आला तरी मालेगाव शहरातील परवानाधारक सुमारे ६ हजार रिक्षा चालक अद्याप शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून मदत मिळेना आणि कोरोनाच्या निर्बंधांमुळे प्रवासी मिळेना, अशी अवस्था या रिक्षा चालकांची झाली आहे.
कोरोनामुळे मागील संपूर्ण वर्ष कसेबसे घालवले. काहींनी रिक्षा विकून टाकल्या अन् मिळेल ते काम सुरू केले. त्यात पेट्रोलच्या किमतीही भरमसाट वाढल्या. त्यामुळे रिक्षा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. लोकांकडून कर्ज घेऊन मागचे वर्ष कसबसे लोटले, त्यानंतर व्यवहार पूर्वपदावर आल्यानंतर कसाबसा रिक्षा व्यवसाय सुरू झाला. घरी चूल पेटू लागली तर पुन्हा कोरोना वाढला आणि शासनाने निर्बंध लादले. निर्बंध कडक केल्याने एका वेळी पूर्ण क्षमतेने प्रवासी बसवता येत नाहीत. मर्यादित प्रवाशांचे निर्बंध असल्याने आणि कोरोनाची दहशत असल्याने प्रवासी रिक्षात बसेनासे झाले आहे.
इन्फो
खरे रिक्षा चालक दूरच
बरेच लोक रिक्षाचे परवाने काढून रिक्षा भाड्याने देतात. राज्य शासनाकडून केवळ परवानाधारक रिक्षामालकांना पंधराशे रुपयांची मदत मिळणार असल्याने रिक्षा भाड्याने घेऊन व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मालेगाव उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून याबाबत काम सुरू आहे. तालुक्यात साडेसहा हजार परवानाधारक रिक्षा चालक असून त्यांची कागदपत्र तपासणी केली जात आहे.
- किरण बिडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी