शहरातील सहा जलकुंभ धोकेदायक
By Admin | Updated: June 9, 2017 01:33 IST2017-06-09T01:32:45+5:302017-06-09T01:33:03+5:30
आयुर्मान संपले : महापालिका करणार पुन:निर्माण

शहरातील सहा जलकुंभ धोकेदायक
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील १०१ जलकुंभांपैकी सहा जलकुंभांना ३० वर्षांहून अधिक काळ लोटल्याने त्यांचे आयुर्मान संपले आहे. सदर जलकुंभ धोकेदायक बनल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत त्यांच्या पुन:निर्माणाचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एम. चव्हाणके यांनी दिली.
नाशिक शहरात एकूण १०१ जलकुंभ असून, त्यांची क्षमता १६३ दशलक्ष लिटर्स इतकी आहे. त्यात काही जलकुंभांचे बांधकाम हे ३० ते ३५ वर्षे इतके जुने आहे. सर्वसाधारणपणे ३० वर्षे आयुर्मान असते. त्यामुळे शहरातील सहा जलकुंभांचे आयुर्मान संपले असून, ते धोकेदायक बनले आहेत. त्यात पंचवटीतील जलशुद्धीकरण केंद्राजवळील जलकुंभ, लुंगे जलकुंभाजवळील जलकुंभ, नाशिकरोड विभागात दुर्गा उद्यानातील जलकुंभ, सातपूर विभागातील म्हाडा कॉलनी, सिडकोतील पाथर्डी फाट्यावरील चार जलकुंभांपैकी एक तर नाशिक पूर्वमधील सादिक शहा जलकुंभ यांचा समावेश आहे.