परिस्थिती पूर्वपदाकडे : आज गृहराज्यमंत्र्यांचा दौरा
By Admin | Updated: July 18, 2015 23:10 IST2015-07-18T23:09:56+5:302015-07-18T23:10:59+5:30
हरसूलमध्ये ईद शांततेत

परिस्थिती पूर्वपदाकडे : आज गृहराज्यमंत्र्यांचा दौरा
नाशिक : हरसूल आणि ठाणापाडा परिसरात असलेल्या तणावपूर्ण स्थितीत शनिवारी ईद शांततेत साजरी झाली. यादरम्यान, परिसरात झालेल्या शांतता समितीच्या सभेलाही गावकऱ्यांनी हजेरी लावली.
गेल्या काही दिवसांपासून होरपळणाऱ्या हरसूल आणि ठाणापाडा परिसरात ईदसाठी विशेष बंदोबस्त लावण्यात आला होता. अनेक राजकीय नेत्यांच्या आवाहनानंतर येथे तणावपूर्ण शांततेत ईदसाठी दुकाने उघडली गेली. हरसूलमधील लूटमार झालेली दुकानेही आज उगडण्यात आली. परिवहन महामंडळाची आणि खासगी वाहतूकही येथे सुरळीत झाल्याने परिसरात भाजीपाला, दूध आणि गॅसचे वितरण सुरू झाले. भाजीबाजाराबरोबरच ईदसाठी बाजार लावल्याने खरेदीसाठी नागरिकही बाहेर पडल्याचे दिसत होते.
यातच पोलिसांनी आयोजित केलेल्या शांतता सभेला परिसरातील सर्वधर्मीयांनी प्रतिसाद देत हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील वातावरण पूर्वपदावर येण्याकडे सुरुवात झाल्याचे दिसून आले. सकाळी ईदचे नमाजपठण झाल्यानंतर सायंकाळी एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत होते. त्यामुळे वातावरण पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत होते. दरम्यान, परिसरात असलेला पोलीस बंदोबस्त कायम असल्याने दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.(प्रतिनिधी)