धनगर समाजाचा सिन्नरला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 18:01 IST2018-08-26T18:01:13+5:302018-08-26T18:01:32+5:30
सिन्नर : सिन्नर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने सकल धनगर समाज कृती समितीच्यावतीने सिन्नर तहसील कार्यालयावर सोमवार (दि. २७) रोजी सकाळी ९ वाजता शेळ्या-मेंढ्यासह धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

धनगर समाजाचा सिन्नरला मोर्चा
सिन्नर : सिन्नर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने सकल धनगर समाज कृती समितीच्यावतीने सिन्नर तहसील कार्यालयावर सोमवार (दि. २७) रोजी सकाळी ९ वाजता शेळ्या-मेंढ्यासह धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती ( एस.टी.) प्रवर्गाच्या सवलती शासनाने तत्काळ लागू कराव्यात, समाजाला घटनेत नमूद केलेल्या अनुसुचीत जमातीच्या केंद्र शासनाच्या यादीत क्रमांक ३६ मध्ये सवलती लागू केलेल्या आहेत. त्या सवलती महाराष्ट्र शासनाने त्वरीत लागू कराव्या अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. धनगर समाजाची शासनाने फसवणूक केली असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. त्यामुळे या समाजाचे शैक्षणिक, नोकरीत मोठे नुकसान झाले आहे. लोकसभा व राज्यसभेत अनेकवेळा आवाज उठवूनही आरक्षणावर आजपर्यंत कोणताही तोडगा काढला नाही. मुळात धनगड व धनगर हे समाज एकच असून केवळ अपभ्रंश करून शासन समाजाला वेठीस धरत असल्याचा आरोप केला जात आहे. झारखंड, तामिळनाडू, ओडीसा, उत्तरप्रदेश आदी राज्यात हा समाज अनुसूचित जमातीत
आहे.परंतु महाराष्ट्रात हा समाज भटक्या जातीत गणला गेला आहे. धनगर समाज हा मुळातच पशुपालक असून भटकंती करणारा समाज आहे. या समाजाला त्वरित आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारला जाग आणण्यासाठी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सोमवारी सकाळी ९ वाजता आडवा फाटा (हुतात्मा स्मारक) येथून मोर्चास प्रारंभ होणार असून यावेळी धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.