सिन्नरला घरफोडी करून दोन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:21 IST2020-08-06T21:27:29+5:302020-08-07T00:21:11+5:30
सिन्नर : शहरातील शिवाजीनगर भागातील जुन्या पवार शाळेजवळील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ८० हजार रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने मिळून दोन लाख सहा हजारांचा ऐवज लंपास केला.

सिन्नरला घरफोडी करून दोन लाखांचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : शहरातील शिवाजीनगर भागातील जुन्या पवार शाळेजवळील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ८० हजार रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने मिळून दोन लाख सहा हजारांचा ऐवज लंपास केला.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मूळचे तालुक्यातील घोटेवाडी येथील रहिवाशी असलेले श्रीधर सबाजी सरोदे (५०) कुटुंबीयांसह शहरातील शिवाजीनगर येथे जुन्या पवार शाळेजवळ वास्तव्यास असून, घोटेवाडी येथे शेतीच्या कामासाठी नेहमी ये-जा करत असतात. सरोदे कुटुंबीय शेतकामासाठी घराला कुलूप लावून घोटेवाडी येथे गेले होते. रात्री उशीर झाल्याने त्यांनी घोटेवाडी येथील शेतातील घरातच मुक्काम केला. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी सरोदे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले ८० हजार रुपये तसेच ६० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाची सोन्याचे मणीमंगळसूत्र व ओमपान असलेली सोन्याची पोत, ३० हजार रुपये किमतीचा एक तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, १५ हजार रुपये किमतीचे अर्धा तोळ्याचे सोन्याचे डोरले, १५ हजार रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाची सोन्याची नथणी, सहा हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे ओमपान असा दोन लाख सहा हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला. याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सकाळी सरोदे यांच्या वरच्या मजल्यावर वास्तव्यास असलेले भाडेकरू वामन सुदाम कातोरे यांनी सरोदे यांना फोन करून घराचे कुलूप तोडलेले असल्याचे सांगितले. सरोदे यांनी लागलीच सिन्नरला धाव घेऊन घरात पाहणी केली असता कपाट उघडे व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी कपाटात पाहिले असता चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्याने सरोदे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीची फिर्याद दिली.